संपादकीय

बिनविरोधचा यड्रावकर-पाटील यांना प्रस्ताव

 

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी शिरोळ तालुक्यातून दत्त शिरोळ साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दोघे इच्छुक आहेत.मात्र, तेथील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही नेत्यांना आम्ही प्रस्ताव दिला. विचार करून निर्णय सांगा, असेही सांगितले आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुश्रीफ म्हणाले, की जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणे शक्य नाही. प्रत्येक तालुक्यात राजकीय इर्ष्या आहे, मात्र ज्या ठिकाणी बिनविरोध शक्य आहे, तेथे संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिरोळ तालुक्यातील निवडणुकीसंदर्भात आज चर्चा झाली. मंत्री यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यासमोर आम्ही बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर त्यांना विचार करण्यास सांगितले. त्यावर ते काय सांगतात, हे दोन दिवसांत कळेल. जोपर्यंत सगळे अर्ज भरले जात नाहीत, तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही.

दरम्यान, आज ‘राष्ट्रवादी’च्या इच्छुकांची बैठक झाली. त्यात काल (ता. २७) जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीचा वृत्तांत सांगण्यात आला. दोन दिवसांत सर्वांनी अर्ज भरावेत. त्यानंतर नेते सांगतील तसे करावे, अशी सूचना सर्व इच्छुकांना दिली आहे. शक्य त्या सर्व जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यावर भर राहील. बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, उद्योजक व्ही. बी. पाटील, मानसिंग गायकवाड, भय्या माने आदी उपस्थित होते.

Back to top button