बीड
वडिलांची 29 वर्षांची परंपरा कायम; लातूरच्या 500 भाविकांची भव्य शिवकावड प्रभू वैद्यनाथाच्या चरणी!

वडिलांची 29 वर्षांची परंपरा कायम; लातूरच्या 500 भाविकांची भव्य शिवकावड प्रभू वैद्यनाथाच्या चरणी!
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी
पवित्र श्रावण महिन्यानिमित्त पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी लातूर ते परळी अशी भव्य-दिव्य शिवकावड यात्रा रविवारी, दि. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी वैद्यनाथ नगरीत दाखल झाली. लातूर शहरातील मोतीनगर भागातील ललितकुमार बालकिशन शर्मा परिवाराच्या वतीने या शिवकावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सुमारे 500 भाविकांचा सहभाग असलेल्या या कावड यात्रेचे परळीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताका आणि ‘हर हर महादेव’, ‘जय भोले’, ‘वैद्यनाथ भगवान की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. परळी शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे या यात्रेला पारंपरिक धार्मिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
दरम्यान, या शिवकावड यात्रेला यंदा विशेष भावनिक पार्श्वभूमी लाभली. लातूरच्या मोतीनगर भागातील कै. बालकिशन शर्मा यांनी सुमारे 29 वर्षांपूर्वी मोजके मित्र व नातेवाईक यांना सोबत घेऊन लातूर ते परळी शिवकावड पदयात्रेची सुरुवात केली होती. दरवर्षी ही यात्रा काढताना परिसरातील नागरिक व नातेवाईक या यात्रेत सहभागी होत गेले आणि भाविकांची संख्या वाढत गेली.
काही महिन्यांपूर्वी बालकिशन शर्मा यांचे वयाच्या 75 व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाचा मुख्य आधार गमावल्याचे दुःख असतानाही चारही भावांनी वडिलांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार केला. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिवकावड पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आणि तयारीला सुरुवात केली.
*“वडिलांच्या निधनानंतरही त्यांची श्रद्धा आणि परंपरा पुढे नेत आम्ही यंदाची शिवकावड यात्रा काढत आहोत. ही यात्रा आमच्यासाठी केवळ धार्मिक यात्रा नसून वडिलांच्या स्मृतींना वाहिलेली श्रद्धांजली आहे,” अशी भावना ललितकुमार बालकिशन शर्मा व विजयकुमार शर्मा (व्यापारी, लातूर) यांनी व्यक्त केली.*



