बीड
शालेय विद्यार्थ्यांसाठी डॉ. साळुंके यांचे ‘गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची’ चे थाटात प्रकाशन

शालेय विद्यार्थ्यांसाठी डॉ. साळुंके यांचे ‘गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची’ चे थाटात प्रकाशन
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचा इतिहास नव्या पिढीला कळावा व बीडच्या इतिहासाचे शालेय विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या उद्दिष्टाने लिहिलेल्या इतिहासकार डॉ. सतीश साळुंके यांच्या ‘गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची’ या पुस्तकाचे थाटात प्रकाशन संपन्न झाले.
भगवान महाविद्यालय, आष्टी येथील गंगाई-बाबाई महोत्सवात प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रभाकर लुलेकर, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित, संयोजक भीमराव धोंडे, सौ धोंडेताई, माजी आमदार राजेंद्र जगताप, ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख, प्रा. सुशीला मोराळे, अशोक हिंगे, सुभाषचंद्र सारडा आदी मान्यवर उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशनासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अर्थसहाय्य केले असून राजेंद्र जगताप यांनी पुस्तक प्रकाशनासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी बोलताना राजेंद्र जगताप म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे तर अशोक देशमुख म्हणाले या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात विविध माहितीच्या ठिकाणी क्यु आर कोड दिले असल्याने प्रत्यक्ष त्या स्थळाची ऐतिहासिक माहिती मुलांना कळू शकेल. हा माहितीपट व्हिडिओ स्वरूपात दिसेल. आनंददायी शिक्षणाचे हे सर्वोत्तम उदाहरण असून शासनाने व शिक्षण विभागाने हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा. तर भीमराव धोंडे म्हणाले की, इतिहास समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शालेय मुलांसाठी हे पुस्तक अभ्यासक्रम पुस्तकांच्या तुलनेत जास्त महत्त्वाचे आहे. समाज उपयोगी उपक्रमात आपण सातत्याने मदत करीत राहु. कार्यक्रमास महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, उत्तम बोडखे व अन्य मान्यवर उपस्थित होते



