बीड
शाळेने आमच्या जिवनास आकार दिला – गेट टुगेदर कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांच्या भावना

शाळेने आमच्या जिवनास आकार दिला – गेट टुगेदर कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांच्या भावना
गेवराई (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय भेंडटाकळी शाळेतील सन 2011-12 च्या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. उदय पाठक सर तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक व जयभवानी स.सा. कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. गणपत नाटकर सर व श्री. गंगाधर बोर्डे सर, सरपंच श्रीराम उबाळे हे होते.
सन 2011-12 ची बॅच व त्यावेळी कार्यरत असणारे अध्यापक सर्वश्री शाम कुलकर्णी सर, कदिर पठाण सर, विनायक उबाळे सर, मधुकर गायके सर, बंडुमामा आबुज, गोपीनाथ कोळपे सर विशेष करुन जि. प. प्राथमिक शाळा भेंडटाकळी शाळेत कार्यरत असणारे श्री. संभाजी पाटील सर व महेंद्र पाटील सर व सर्व माजी विद्यार्थ्यांना लेझीम पथकाने वाजत गाजत स्वागत करुन प्रवेशीत केले. सर्वांचा यथोचित सन्मान केल्यानंतर सर्वांनी स्वतःचा परिचय देऊन आपण सध्या कोणत्या क्षेत्रात कार्य करतो आहोत हे सांगीतले व या प्रत्येक ठिकाणी काम करत असताना सर्व गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला खुप फायदा झाला व त्यामुळेच आम्ही यशस्वी झालो खऱ्या अर्थाने शाळेने आमच्या जिवनास आकार दिला अशी भावना व्यक्त केली. या प्रसंगी सर्व गुरुजनांनी आपले विचार मांडले. साडेतीनशे किलोमीटर हुन आलेले संभाजी पाटील सर व महेंद्र पाटील सर यांनी अतिशय गुणी विद्यार्थ्यांनी आम्हाला आठवण ठेवून निमंत्रित केल्या बद्दल आभार व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी त्यांना आपल्या भावणा अनावर झाल्या. बोर्डे सर व नाटकर सर यांनी या बॅचच्या विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे विशद केले. अध्यक्षीय समारोपात बोलताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. उदय पाठक सर यांनी आपण शाळेची आणि आपल्या गुरुजनांची आठवण ठेवून शाळेत आलात व सरांचा सन्मान करुन आपली कृतज्ञता व्यक्त केली याबद्दल समाधान व्यक्त केले. शाळा तुमचीच आहे कधीही या असे निमंत्रण देऊन इतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याचे व प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन प्रियांका उबाळे यांनी तर आभार श्री. रवी उबाळे सर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री रवी उबाळे, विठ्ठल लांडे, राहुल गायके व सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरुची भोजनाने कार्यक्रम संपन्न झाला.



