बीड
भंडाऱ्यात GST निरीक्षकाचा ३५ हजाराचा ‘लाचचा फटका’—सापळ्यात अटक!

भंडाऱ्यात GST निरीक्षकाचा ३५ हजाराचा ‘लाचचा फटका’—सापळ्यात अटक!
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा: GST विभागातील “अंदरची लाचबाज मंडळी” पुन्हा एकदा समोर आली आहे. भंडारा येथील राज्य कर निरीक्षक मनीष मुरलीधर सहारे यांनी GST क्रमांक पुन्हा सुरू करण्याच्या नावाखाली ३५,०००/- रुपयांची लाच मागितली आणि स्वीकारली, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एंटी करप्शन सेल) सापळा कारवाईत आरोपीला पकडले असून, भंडारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
तक्रारदाराचा GST क्रमांक ऑक्टोबर २०२५ पासून बंद होता. २ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदाराने gst.gov.in वरून ऑनलाइन अर्ज केला. त्यानंतर GST विभाग नागपूरकडून लेझरशीट बनवून चालान भरून पाठवण्याचे निर्देश मिळाले. तक्रारदाराने १०,४२८/- रुपये ऑनलाइन भरून लेझरशीट तयार केली, परंतु GST क्रमांक अद्यापही सुरु झाला नाही.
यानंतर तक्रारदाराने भंडारा येथील राज्य कर निरीक्षक मनीष सहारे यांची भेट घेतली. GST क्रमांक अद्याप सुरु न झाल्याचे सांगितले असता, आरोपीने GST क्रमांक पुन्हा सुरु करून देण्याच्या मोबदल्यात ३५,०००/- रुपये लाच मागितली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिला आणि १५ जानेवारी २०२६ रोजी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १६ जानेवारी २०२६ रोजी आरोपीच्या कार्यालयात पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणी दरम्यान आरोपीने ३५,०००/- रुपये लाच मागणे आणि स्वीकारणे याची कबुली दिली. नंतर २० जानेवारी २०२६ रोजी सापळा कारवाईत आरोपीने तक्रारदाराकडून ३५,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारली. या वेळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून ३५,०००/- रुपये आणि Samsung Galaxy S२४ मोबाईल जप्त करण्यात आला. भंडारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, नोंद झाल्यानंतर आरोपीवर अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
या सापळा कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा यांचे पथक पुढील अधिकारी व पोलीस अधिकारी सहभागी होते. या कारवाईला मार्गदर्शन व नेतृत्व दिगंबर प्रधान (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र), माधुरी बाविस्कर (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र) आणि विजय माहूलकर (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र) यांनी केले. तसेच डॉ. अरुणकुमार लोहार (पोलीस उपधीक्षक), पोलीस निरीक्षक उज्वला मडावी, पोलीस निरीक्षक नितेश देशमुख, पो हवा अतुल मेश्राम, पो हवा मिथुन चांदेवार, पो शि विष्णू वरठी, पो शि सुमेध रामटेके, पो शि हिरा लांडगे, पो शि हितेश हलमारे, पो शि राजकुमार लेंडे, पो शि प्रतीक उके, पोशि मयूर सिंगणजूडे, मपोशि दुर्गा साखरे, चालक पोशि पंकज सरोते हे अधिकारीही कारवाईत सहभागी होते.
या प्रकरणातून स्पष्ट होते की GST क्रमांक सुरू करण्याच्या नावाखाली लाच मागण्याची मानसिकता अजूनही कायम आहे. मात्र, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वेळेत कारवाई करून भ्रष्टाचाराचा भयानक पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे जनतेमध्ये भ्रष्टाचाराविरोधात विश्वास निर्माण झाला असून, भंडारा विभागात “शून्य सहिष्णुता”ची भूमिका दृढपणे दाखवली गेली आहे.



