बी.के. शिंदे कॉलेजचे उपक्रम कौतुकास्पद : उपनगराध्यक्ष पोपट राळेभात

बी.के. शिंदे कॉलेजचे उपक्रम कौतुकास्पद : उपनगराध्यक्ष पोपट राळेभात
बी.के.शिंदे काॅलेज मध्ये डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल चे उद्घाटन व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी :,बी.के.शिंदे कॉलेजचे उपक्रम कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी व अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा बी.के. शिंदे कॉलेजमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. शिंदे यांनी कॉलेजमधील प्रत्येक वर्गखोलीत डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवले असून यामुळे अध्यापन प्रक्रियेत गुणवत्ता व परिणामकारकता वाढणार आहे, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांनी केले.
श्रीनाथ एज्युकेशन फाउंडेशनच्या बी.के.शिंदे कॉलेजमध्ये आज मंगळवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना राळेभात म्हणाले, या कॉलेजच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी घडले असून यासाठी प्राचार्य पंकज शिंदे हे तळमळीने कार्य करत आहेत. येथील अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करत आपले उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहनही उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष पोपट राळेभात हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने हे होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मंगलताई शिंदे, सचिव बाळासाहेब शिंदे,भाजपा गटनेते तथा नगरसेवक तात्याराम पोकळे, प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक, मोहन पवार, राजेंद्र गोरे, पवन राळेभात, नगरसेविका वर्षाताई माने, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, अर्जुन म्हेत्रे, प्रवीण होळकर,वसिम सय्यद, संतोष गव्हाळे, सागर टकले, प्राध्यापक पंकज शिंदे आदी मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा. कैलास माने, प्रा. विकी घायतडक, पवन राळेभात, अमित चिंतामणी आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पंकज शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन भक्ति पंडित व शिवानी लटपटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन संस्थेचे सचिव बाळासाहेब शिंदे यांनी मानले.



