श्री क्षेत्र भगवानगडाची पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे भक्तमय वातावरणात मार्गस्थ

श्री क्षेत्र भगवानगडाची पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे भक्तमय वातावरणात मार्गस्थ
अहिल्यानगर (प्रशांत बाफना) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाची पायी पालखी सोहळा आज मंगळवार दि.२४ रोजी ढोल ताश्याच्या निदनात, टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थित पंढरपूर कडे भगवा पताका हाती घेत
मार्गस्थ झाली आहे.
श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक, ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबा यांनी नारायणगडावर असतानाच मराठवाड्यातून पहिला पायी पालखी सोहळा प्रारंभ केला होता. हीच परंपरा भगवानगडाच्या स्थापनेपासून ते आजतागायत कायम सुरु आहे. श्री क्षेत्र भगवानगडावरुन निघणाऱ्या या पायी पालखी सोहळ्याचे मंगळवार दि.२४ जून रोजी दुपारी ठीक ४ च्या सुमारास पंढरपूरकडे हजारो भाविकांच्या उपस्थित प्रस्थान झाले आहे.
पालखीचे मुक्काम अनुक्रमे भारजवाडी, बावी, खोकरमोह, करंजवन, डिघोळ, जयवंतनगर, कुंबेफळ, पिपरी, कुर्डुवाडी, ढेकळेवाडी या ठिकाणी होऊन अकराव्या मुक्कामाला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते. दरम्यान प्रस्थानापासून ते पंढरपूरमध्ये पोहचेपर्यंत असंख्य दिंड्या भगवानगडाच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात.
यामध्ये प्रामुख्याने अंभोरे येथील भोसले महाराजांची दिंडी, गुंजमुर्ती संस्थान, शेषाबाई संस्थान तांबवा, रामगड संस्थान, विठ्ठलगड संस्थान, रामेश्वर संस्थान, भगवानबाबा संस्थान सुपेसावरगांव, भोगलवाडी संस्थान, राजा हरिश्चंद्र संस्थान, जवळा ग्रामस्थ, संत भगवानबाबा संस्थान बोरकिन्ही, भाग्येश्वर संस्थान, गणपतबाबा संस्थान सावरगाव, कुमंडलेश्वर संस्थान घोगस पारगांव, सिद्धेश्वर संस्थान शिरुर कासार, मायंबा संस्थान भालगांव, भगवानबाबा संस्थान संभाजीनगर-पैठण-आळंदी, कानिफनाथ संस्थान खडकवाडी, केशवराज संस्थान वारणी, कानिफनाथ संस्थान खर्डा, हनुमान टाकळी संस्थान, शहर टाकळी संस्थान, कानिफनाथ संस्थान खोकरमोह, सालसिद्धेश्वर संस्थान मिडसांगवी, भगवानबाबा संस्थान तागडगांव इत्यादी संस्थानांचा समावेश होतो. ह.भ.प.महंत न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या भव्यदिव्य पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी भगवानगड परिसरातील हजारो भाविकांची मोठी उपस्थिती होती.
———-



