नगर रोडवरील बालेपीर बीडमध्ये नाल्याच्या छताचा भाग कोसळला; विकासकामाचा दर्जा संशयास्पद
संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार करणार – अमरजान पठाण
बीड प्रतिनीधी :-शहरातील नगर रोडवरील बालेपीर परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्ता आणि नाल्याचे विकासकाम सुरू असून, या कामाच्या दर्जावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रोशन पुरा गल्ली क्रमांक ७ मध्ये नाल्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या छतावरून एक साधे चार चाकी वाहन गेल्याने छताचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकारामुळे विकासकामाच्या दर्जावर नागरिकांकडून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असून कामही अर्धवटपणे तातडीने पूर्ण करण्यात आले. यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरजान पठाण मनसे शहराध्यक्ष लवकरच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.