बीड

अनुसूचित जातीतील फूट कदापीही मान्य नाही

अनुसूचित जातीतील फूट कदापीही मान्य नाही
पुणेतील विराट सभेत बाबुराव पोटभरे यांचा उपवर्गीकरणाला तीव्र विरोध
पुणे/प्रतिनिधी
अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारे कोणतेही धोरण आम्हाला मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांवर आधारित भारत उभारण्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे, असे ठाम प्रतिपादन बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केले.
  अनुसूचित जातींच्या आरक्षणातील ‘अबकड’ उपवर्गीकरणाच्या विरोधात निघालेला बीड ते मुंबई पायी लॉंग मार्च पुण्यात दाखल झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानक परिसरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना पोटभरे यांनी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या हालचालींवर जोरदार टीका केली.
     ते म्हणाले, “शोषित, पीडित आणि वंचित समाजघटकांना एकत्र आणून जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत आणि रंग यांच्या भिंती मोडीत काढणे हेच आमचे ध्येय आहे. सामाजिक ऐक्याला तडा जाईल असे कोणतेही उपवर्गीकरण आम्ही कदापीही स्वीकारणार नाही. हा लाँग मार्च कोणत्याही समाजाविरोधात नसून अन्यायकारक धोरणांविरोधातील लोकशाही मार्गाने उभारलेला संघर्ष आहे.”
   पोटभरे यांनी पुढे सांगितले की, बीड ते मुंबई पायी लाँग मार्च हा केवळ मोर्चा नसून प्रस्थापित व्यवस्थेविरोधातील बहुजन समाजाचा आक्रोश आहे. संविधानिक हक्क, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मूळ तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी हजारो भीमसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. हा संघर्ष समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर समाजाला अधिक बळकट करण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
   यावेळी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी लाँग मार्चमध्ये सहभागी भीमसैनिकांशी तसेच पुणे शहरातील आंबेडकरी अनुयायांशी संवाद साधला. सभास्थळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
   पायी लाँग मार्चचे मुख्य संयोजक सिद्धार्थ शिनगारे, अजय सरवदे, प्रेम कांबळे, संदीप जाधव यांच्यासह शेकडो भीमसैनिक  सहभागी झाले असून, मुंबईकडे कूच करणारा हा संघर्षमय प्रवास आता अधिक तीव्र होत आहे. राज्यभरातून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता उपवर्गीकरणाच्या विरोधातील आंदोलनाला नवे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
  “समतेसाठी संघर्ष, ऐक्यासाठी पायी प्रवास आणि संविधान रक्षणासाठी निर्धार” अशा घोषणांनी पुण्यातील वातावरण भारावून गेले होते. बीडपासून सुरू झालेला हा लाँग मार्च आता सामाजिक न्यायाच्या व्यापक लढ्याचे प्रतीक बनत असून, मुंबईत पोहोचेपर्यंत हा आवाज अधिक बुलंद होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Back to top button