बीड

गावकर्‍यांना योजनेचा लाभ मिळावा याकरिता बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची माळापुरीमध्ये जनजागृती बैठक ;

गावकर्‍यांना योजनेचा लाभ मिळावा याकरिता बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची माळापुरीमध्ये जनजागृती बैठक ;

तहसीलदार शेळके यांचा शेतकर्‍यांशी मुक्त संवाद – बैठकीत प्रश्नांवर जागेवर तोडगे

बीड (प्रतिनिधी):- कुर्ला मंडळ मधील मौजे माळापुरी येथे आयोजित करण्यात आलेली महसूल मंडळस्तरीय आढावा बैठक केवळ औपचारिकता न राहता, थेट नागरिकांच्या प्रश्नांना हात घालणारी आणि ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारी लोकाभिमुख संवादसभा ठरली. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या नियमित आढावा बैठका, तपासणी दौरे आणि स्पष्ट सूचनांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेला नवी दिशा मिळाल्याचे या बैठकीत जाणवले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, उपविभागीय अधिकारी कविता जाधव तसेच निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात असल्याचे अधोरेखित करण्यात आले. प्रशासन केवळ नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा न राहता, समाजाच्या संवेदनशील प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेणारी व्यवस्था बनावी, या दृष्टीने निर्णय घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले. बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीबाबत अनुदान, ई-पीक नोंदणी, ई-पीक पाहणी, नुकसान भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता तसेच थेट लाभ योजनांचा लाभ घेण्याबाबत, तसेच सेवा मित्र अंतर्गत प्रमाणपत्र यांचे वाटप व मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार शेळके यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांशी थेट संवाद साधत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विषयांवरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. बालविवाह रोखण्यासाठी गावपातळीवर जनजागृती, शाळा-महाविद्यालयांत समुपदेशन, ग्रामपंचायत आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले .  जशी करणी तशी भरणी  या म्हणीचा दाखला देत समाजातील कुप्रथा रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे शेळके यांनी स्पष्टपणे सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, जलसंधारण, व्यसनापासून दूर राहणे, प्लास्टिकमुक्त अभियान आणि नैसर्गिक साधन-संपत्तीच्या जतनासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रात शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांची गळती थांबवणे, शिक्षक-पालक समन्वय वाढवणे आणि शैक्षणिक सुविधा बळकट करणे या उपाययोजनांवरही चर्चा झाली. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला. बैठकीत उपस्थित असलेल्या एका शेतकर्‍याने समाधान व्यक्त करत सांगितले,  आमचे प्रश्न गावातच ऐकलेजात आहेत, हीच आमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे. आता तालुक्याच्या फेर्‍या माराव्या लागत नाहीत.  तर ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सांगितले,  अशा बैठकीमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होते, विश्वास वाढतो आणि कामकाजात पारदर्शकता येते. बैठकीस मंडळ अधिकारी जितेंद्र वाघ, ग्राम महसूल अधिकारी दुष्यंत शेळके, संजय नेवडे, सुनील प्रधान, उमेश खिंडरे, माणिक पांढरे ग्रामपंचायत अधिकारी मिसाळ, कृषी अधिकारी थोरात मॅडम, गव्हाणे मॅडम, माळापुरीचे सरपंच अशोक ढास, उपसरपंच समीर बेग, सीएससी सेंटर चालक मिर्झा तसिम बेग, वैभव कुटे, ग्रामस्थ संदीप तीपाले, जयदत्त बादाडे, रामनाथ तीपाले  तसेच माळापुरी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यकांनी विविध कृषी योजनांचे तसेच ई-पीक व कृषी प्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखवले. ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणी तहसीलदार शेळके यांनी संयमाने ऐकून घेतल्या. अनेक प्रश्नांवर जागच्या जागी मार्गदर्शन देत काही विषयांवर तात्काळ तोडगे सुचविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात वारंवार फेर्‍या मारण्याची गरज भासली नाही.  थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे छोट्या-छोट्या उपाययोजनांतून मोठे बदल घडू शकतात, हा विश्वास नागरिकांत निर्माण झाला. एकूणच, माळापुरी येथील ही महसूल मंडळस्तरीय आढावा बैठक राज्य शासनाच्या धोरणात्मक दिशेचा, विभागीय व जिल्हास्तरीय मार्गदर्शनाचा आणि तालुकास्तरावरील संवेदनशील अंमलबजावणीचा सुंदर संगम ठरली. प्रशासनाची तत्परता, निर्णयक्षमता आणि नागरिकांचा वाढता विश्वास यामुळे ही बैठक लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श नमुना ठरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Back to top button