📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत गुजर समाज आक्रमक; उमेदवारी न मिळाल्यास समाजशक्ती पणाला लावण्याचा निर्धार

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत गुजर समाज आक्रमक; उमेदवारी न मिळाल्यास समाजशक्ती पणाला लावण्याचा निर्धार
बीड-प्रतिनिधी
पाली, लिंबा गणेश (शिरूर तालुका) तसेच पाटोदा तालुक्यातील एका जिल्हा परिषद गणामध्ये गुजर समाजाचे निर्णायक मतदान व प्रभावी राजकीय वजन आहे. या भागांमध्ये जो राजकीय पक्ष गुजर समाजाला प्राधान्याने सहकार्य करेल व समाजाच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी देईल, त्या पक्षाच्या पाठीशी आगामी निवडणुकीत खंबीरपणे उभे राहण्याचा ठाम निर्णय गुजर समाजाने घेतला आहे.
खासदारकी वा आमदारकीची मागणी न करता, आतापर्यंत सर्व पक्षांच्या पाठीशी उभा राहणारा गुजर समाज यावेळी मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपली ताकद दाखवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वरील गणांमध्ये समाजाची मतदान क्षमता लक्षणीय असून, सर्व समाजबांधव एकत्र येत उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या लढाईत देशभरातील गुजर समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा देण्याचा शब्द दिला असून, कार्यकारी अध्यक्ष भीमसिंह गुजर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी गुजर (नाशिक) यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व समाजाच्या पाठीशी उभे राहणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये चर्चा करून ही लढाई ताकदीने लढण्याचा व जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
गुजर समाजाच्या इच्छुक उमेदवारांवर सविस्तर चर्चा करून, तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचे मत घेऊन सर्वानुमते उमेदवार निश्चित केला जाईल. जर कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर समाजाची संघटित ताकद वापरून प्रत्येक मतदान एकवटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्यथा समाजाची खरी ताकद दिसून येणार नाही, असे आवाहन करण्यात आले.
ही माहिती अखिल भारतीय गुजर समाजाचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर व जिल्हा उपाध्यक्ष सुनील गुजर यांनी दिली. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button