बीड
आहेर धानोरा येथे डिजिटल साक्षरता कार्यक्रम व जागतिक महिला दिन उत्साहात

आहेर धानोरा येथे डिजिटल साक्षरता कार्यक्रम व जागतिक महिला दिन उत्साहात
सीएससी (Common Services Centre) व कल्याणी कॉम्प्युटर यांच्या संयुक्त उपक्रमातून आहेर धानोरा येथे डिजिटल साक्षरता जनजागृती कार्यक्रम व जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये गावातील नागरिक, महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी CSC जिल्हा समन्वयक दिनेश जाधव यांनी सीएससी मार्फत उपलब्ध असलेल्या विविध ऑनलाइन सेवा, शासकीय योजना तसेच डिजिटल व्यवहाराबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील नागरिकांनी डिजिटल सेवा व ऑनलाइन सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक अखिल भारतीय मराठा महासंघाचे विनोद आप्पा इंगोले, शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, तसेच बापूसाहेब साळुंखे, साप्ताहिक क्रांतिवीरच्या कार्यकारी संपादक तक्षशिला सोनवणे, विनोद लक्ष्मणराव इंगोले, माजी सरपंच मसुराबाई इंगोले, अंगणवाडी सेविका कांता इंगोले, अंगणवाडी सेविका जनता दिवे, मंगल इंगोले, राणी कुडके, खेमाडे आदी महिला व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, डिजिटल साक्षरता आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व नागरिकांना डिजिटल व्यवहाराचे महत्त्व, सुरक्षित ऑनलाइन पेमेंट तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश फाटक यांनी केले, तर आभार प्रदर्शन कल्याणी कॉम्प्युटर्सचे संचालक संजय इंगोले यांनी केले.
यावेळी गावातील बचत गटांच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला.


