बीड

रणजित राऊत यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान संशोधनात उज्वल कामगिरी!

रणजित राऊत यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान संशोधनात उज्वल कामगिरी!

जामखेड, दि. २ एप्रिल (प्रतिनिधी) – संजीवनी विद्यापीठ, कोपरगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत फक्राबाद (ता. जामखेड) येथील निसर्ग अभ्यासक, वन्यजीव छायाचित्रकार आणि संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांना प्रतिष्ठित युवा शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आला. रासायनिक तंत्रज्ञान संस्था, उरल फेडरल युनिव्हर्सिटी, रशिया येथील प्रा. एलेना कोवालेवा यांच्या हस्ते २९ मार्च २०२५ रोजी हा पुरस्कार देण्यात आला.

हि आंतरराष्ट्रीय परिषद संजीवनी विद्यापीठ कोपरगाव, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया, युरल फेडरल युनिव्हर्सिटी (रशिया), विज्ञान भारती पश्‍चिम महाराष्ट्र, टारलक कृषी विद्यापीठ (फिलिपाइन्स), इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कंबोडिया) आणि नॅशनल चुंग चेंग युनिव्हर्सिटी (तैवान) यांच्या संयुक्त विद्यमाने २८-२९ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेचा मुख्य विषय “शाश्वत जैव संवर्धन आणि जैव अर्थव्यवस्थेसाठी जैवतंत्रज्ञान संशोधनातील नवकल्पना: आव्हाने आणि पद्धती” असा होता. भारतासह विविध देशांतील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग घेतला.

रणजित राऊत यांनी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांचे ४५ संशोधन निबंध, ५ पेटंट्स आणि ५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी ३० पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले असून, त्यांनी राष्ट्रीय स्तरावर व्याख्याने दिली आहेत.

राऊत यांनी तीन वेगवेगळ्या विषयांत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, वन्यजीव विज्ञान पदविका आणि मधुमक्षिका पालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पीएच. डी. संशोधन विद्यार्थी म्हणून कार्यरत आहेत. जैवतंत्रज्ञान, जीवविज्ञान, प्राणीशास्त्र, वन्यजीवशास्त्र आणि जैवविविधता संरक्षण या क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना हा सन्मान मिळाला.

राऊत यांच्या या यशाबद्दल अनेक शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि संशोधकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक वर्गाने त्यांना पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Back to top button