गजानन कारखान्याचे माजी संचालक चंद्रभान माने यांचे निधन

गजानन कारखान्याचे माजी संचालक चंद्रभान माने यांचे निधन
बीड :
गजानन सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व चंद्रभान नानाभाऊ माने (वय ७५, रा. मन्यारवाडी, ता. बीड) यांचे शनिवारी (ता. ११) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मन्यारवाडी गावासह संपूर्ण तालुक्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
स्व. चंद्रभान माने हे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे सहकारी म्हणून ओळखले जात होते. जयदत्त क्षीरसागर यांच्या अनेक राजकीय व सामाजिक चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनामुळे क्षीरसागर गटासह बीडच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. तसेच ते ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) दिव्यांग आघाडी’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश धर्मराज माने यांचे चुलते होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि माने परिवाराचे सांत्वन केले. स्व. चंद्रभान माने यांच्या पार्थिवावर आज ११ जुलै, शनिवारी सायंकाळी ५ वाजता मन्यारवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



