बीड
‘ पसायदानाद्वारे ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळा कधी?; महाजनवाडी जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक

‘ पसायदानाद्वारे ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळा कधी?; महाजनवाडी जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक
१९५४ सालची शाळा जीर्णावस्थेत; १२५ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, नवीन वर्गखोल्यांसाठी निधीची डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांची मागणी
लिंबागणेश, दि. ११ :
जिल्हा परिषद शाळांमध्ये दररोज ‘पसायदान’ म्हणत विश्वकल्याणाची प्रार्थना करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुसज्ज शैक्षणिक वातावरण मिळेल का, असा प्रश्न महाजनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरवस्थेमुळे निर्माण झाला आहे. बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत १९५४ पूर्वी बांधण्यात आली असून ती सध्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहे. या शाळेत शिक्षण घेणारे सुमारे १२५ विद्यार्थी व शिक्षकांचा जीव धोक्यात असल्याने नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून तातडीने तरतूद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शाळेच्या वर्गखोल्या गळक्या असून भिंतींचे खपले पडत आहेत. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत असल्याने तातडीने नवीन इमारतीचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे डॉ. ढवळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
—
⬛ चौकट १
धोकादायक इमारतीबाबत दरवर्षी अहवाल; तरीही कार्यवाही नाही – मुख्याध्यापक आंधळे एस. डी.
महाजनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून पावसाळ्यात छत गळते, भिंतींचे प्लास्टर कोसळते. ग्रामस्थांनी तात्पुरती डागडुजी केली असली तरी ती अपुरी आहे. शाळेच्या धोकादायक अवस्थेबाबत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर करण्यात येतो; मात्र अद्याप नवीन इमारतीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची माहिती मुख्याध्यापक आंधळे एस. डी. यांनी दिली.
—
⬛ चौकट २
लोकसहभागातून सुविधा उभारल्या; आता नवीन वर्गखोल्यांसाठी शासनाने निधी द्यावा – सरपंच विश्वंभर गिरी
ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेत तात्पुरती दुरुस्ती, पाणी फिल्टर, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, स्टेज आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे नवीन बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी सरपंच विश्वंभर गिरी यांनी केली.
—
⬛ चौकट ३
महाजनवाडी शाळेची स्थिती एका नजरेत
स्थापना : सन १९५४ पूर्वी
विद्यार्थी संख्या : सुमारे १२५
समस्या : जीर्ण व धोकादायक इमारत, गळके छत, भिंतींचे प्लास्टर कोसळण्याचा धोका
तात्पुरती उपाययोजना : ग्रामस्थांकडून डागडुजी
मागणी : जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून नवीन वर्गखोल्यांचे तातडीने बांधकाम
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२



