बीड
माणुसकी अजून जिवंत आहे..! दोन बेवारसांना समाजसेवकांनी दिला कुटुंबीयांसारखा अखेरचा निरोप..!

माणुसकी अजून जिवंत आहे..!
दोन बेवारसांना समाजसेवकांनी दिला कुटुंबीयांसारखा अखेरचा निरोप..!
बीड ( प्रतिनिधी ) :
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात नात्यांपेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र अशा परिस्थितीतही माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे हृदयस्पर्शी उदाहरण बीड शहरात पाहायला मिळाले. दोन बेवारस मृतदेहांवर कोणताही वारसदार किंवा नातेवाईक पुढे न आल्याने बीड शहरातील समाजसेवकांनी पुढाकार घेत 30 मे 2026 शनिवार रोजी दुपारच्या दरम्यान त्यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करून समाजासमोर माणुसकीचा एक आदर्श निर्माण केला.
मिळालेल्या माहितीनुसार, चकलंबा परिसरातील एक महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होती. प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी बीड येथे दाखल करण्यात आले होते. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. उपचार सुरू असतानाच तिचे दुःखद निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी कुणीही नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती पुढे आले नाहीत. त्यामुळे तिचा मृतदेह बेवारस अवस्थेत होता.
याच दिवशी नेकनूर परिसरातील एका वयोवृद्ध आजोबांचेही निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही कोणीही पुढे आले नाही. दोन मृतदेह आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच नसल्याची बाब समोर येताच बीड शहरातील समाजसेवकांनी तत्काळ पुढाकार घेतला. या दोघांनाही आपल्या कुटुंबातील सदस्य समजून त्यांच्यावर पूर्ण धार्मिक विधींसह सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या समाजसेवकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले होते. जिवंतपणी आधार मिळाला नसला तरी मृत्यूनंतर तरी सन्मानाने निरोप मिळावा, या भावनेतून त्यांनी हे कार्य केले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले.
आजच्या काळात रक्ताची नातीही दुरावत असताना, कोणतीही अपेक्षा न ठेवता बेवारस व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या समाजसेवकांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म जपला आहे.
त्यांच्या या कार्यामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
या अंत्यविधीमध्ये पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभले. पोलीस आणि समाजसेवकांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडलेल्या या अंत्यसंस्कारामुळे समाजात संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित झाले.
या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेणाऱ्या समाजसेवकांमध्ये राजू वंजारे, अभिजीत वैद्य, पत्रकार वैभव स्वामी, राजूभाऊ गुळभिले, विजय पंडित, डॉ. संजय तांदळे, गणेश माने, छाया सरोदे, किरण डोळस, सारिका गायकवाड आणि यश वंजारे यांचा समावेश होता. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावामुळे बीड जिल्ह्याचे नाव अभिमानाने घेतले जात असून, “माणुसकी अजूनही जिवंत आहे” याचा प्रत्यय पुन्हा एकदा समाजाला आला आहे.



