बीड

आज भगवानगडावर श्री संत भगवानबाबांचा ६१वा पुण्यतिथी महोत्सव

आज भगवानगडावर श्री संत भगवानबाबांचा ६१वा पुण्यतिथी महोत्सव
भगवानगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं दैवत ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबा यांची आज रविवार दि.४ जानेवारी रोजी ६१ वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र भगवानगडावर भव्य दिव्य मंडप उभारणी केली आहे. भाविकांसाठी सुमारे शंभर क्विंटल साखरेपासून महाप्रसाद बनवला आहे. वाहनांच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. भाविकांच्या वाहनांच्या सुयोग्य पार्किंग व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनासह घोगस पारगांव आणि भारजवाडीतील तरुणांवर जबाबदारी दिलेली आहे. पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अनेक संस्थानांहून व गावांतून लहान-मोठ्या अनेक दिंड्या श्री क्षेत्र भगवानगडावर पोहोचल्या आहेत. मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काटेकोरपणे सर्व देखरेख केली जात आहे.
    आज सकाळी ९ वाजता ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांच्या समाधीची महापूजा होईल. दुपारी १२ वाजता काल्याचे कीर्तन व त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करून पुण्यतिथी कार्यक्रमाची सांगता होईल.
(चौकट….)
*विशेष आकर्षण – महंत शास्त्रीजींचे कीर्तन*
     श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती तथा वारकरी संप्रदायाचे भूषण ह.भ.प.न्यायाचार्य श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे कीर्तन म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणीच असते. आज श्री संत भगवानबाबा यांच्या ६१ व्या पुण्यतिथी निमित्ताने महंत शास्त्रीजींचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविक-भक्तांनी वेळेवर श्री क्षेत्र भगवानगडावर हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 *घोगस पारगांव, भारजवाडी, भालगांव, एकनाथवाडीचे स्वयंसेवक राहणार तत्पर*
 पुण्यतिथी सोहळ्यासाठी जमलेल्या लाखो भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था, संभाव्य चोरट्यांपासून महिलांची सुरक्षितता व इतर सुयोग्य व्यवस्थापनासाठी घोगस पारगांव, भारजवाडी, भालगांव आणि एकनाथवाडीचे स्वयंसेवक पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार आहेत.

Back to top button