बीड

अखेर प्रवाशांना दिलासा-जामखेडकरांसाठी दोन नव्या बस आगारात दाखल

अखेर प्रवाशांना दिलासा-जामखेडकरांसाठी दोन नव्या बस आगारात दाखल

जामखेड | प्रतिनिधी:-गेल्या अनेक महिन्यांपासून जामखेड तालुक्यातील प्रवाशांना बससेवेच्या अपुऱ्या सुविधेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विविध सामाजिक संघटना, प्रवासी संघटनांसह राजकीय नेत्यांनी सातत्याने या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर अखेर जामखेड आगाराला दोन नव्या बस प्राप्त झाल्या आहेत. या बसचे पूजन व चालकांचा सत्कार शहरवासीयांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, ग्रामीण प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गुंदेचा, नगरसेवक अमित चिंतामणी, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, युवा नेते संजय काशिद, भाजप शहराध्यक्ष पवन राळेभात, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गणेश काळे, गणेश लटके, बाळू शेठ गवळी, सागर गुंदेचा, सुरेश जाधव, तसेच बस आगारातील हंगामी आगार व्यवस्थापक शशी खटावकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नितीन दाणी, सुनील वारे, अनिल सदाफुले,गणेश मासाळ, योगेश पोकळे, चालक बाळासाहेब लोंढे व नितीन काशिद, बाळासाहेब कुर्लेकर, बाबू काळदाते आदी मान्यवर उपस्थित होते.

सध्या जामखेड बस आगारातील बसांची अवस्था अत्यंत दयनीय बनली होती. अनेक तालुक्यांना नव्या बसेस मिळाल्या असताना जामखेड मात्र या सुविधेपासून वंचित होते. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर शासनाने याची दखल घेत दोन बस जामखेड आगारासाठी उपलब्ध करून दिल्या असून, लवकरच आणखी आठ बसेस दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या नव्या बससेवेचा फायदा विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यापारी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे. स्थानिक प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, आणखी बसेस मिळाव्यात, अशी मागणीही केली जात आहे.

चौकट

*श्रेयवादाने रंगली बससेवा!*

जामखेड येथे नव्या बस दाखल होताच श्रेयवादाचे राजकारण तापले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि प्रवासी संघटनांनी “आम्हीच या बससाठी प्रयत्न केले” असा दावा केला. त्यामुळे बसच्या स्वागतावेळीही राजकीय चढाओढ दिसून आली.

Back to top button