📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वैद्यकिन्ही येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचु भिंत कोसळली ; रात्री कोसळल्याने दुर्घटना टळली :- डॉ.गणेश ढवळे

वैद्यकिन्ही येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचु भिंत कोसळली ; रात्री कोसळल्याने दुर्घटना टळली :- डॉ.गणेश ढवळे
—-
पाटोदा :- ( दि.०४ ) पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली. भिंत रात्री कोसळल्याने दुर्घटना टळली. त्यामुळे तिसरी वर्गातील मुलांचा वर्ग आज झाडाखाली भरविण्यात आला होता. गेल्या ४-५ वर्षांपासून सातत्याने शिक्षण विभागाला पाठपुरावा करूनही शाळेच्या नविन बांधकाम ईमारतीसाठी निधीची तरतूद न केल्याने सरपंच अतुल मकाळ यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. पालक घडलेल्या घटनेमुळे भयभीत झाले असुन मुलांना शाळेत पाठवावे की नाही या चिंतेत आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी बीडच्या विमानतळासाठी निधी देऊन चिंता करण्यापेक्षा बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मुलभूत सुविधा द्याव्यात अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

सविस्तर माहितीस्तव
—
पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा १९५३ सालची असुन १ ते ७ वी पर्यंत वर्ग असुन एकुण पटसंख्या १३० आहे. एकुण ८ वर्गखोल्या पैकी ६ धोकादायक स्थितीत आहेत. कार्यालयाच्या छताचे पोपडे पडत आहेत. काल दि.३ गुरुवार रोजी मध्यरात्री ३ वर्ग अध्यापन सुरू असलेल्या वर्गाची भिंत कोसळली. रात्री भिंत कोसळल्याने दुर्घटना टळली. दिवसा भिंत कोसळली असती तर गंभीर घटना घटली असती. विस्तार अधिकारी गटशिक्षण विभाग पंचायत समिती पाटोदा हनुमान गव्हाणे यांनी शाळेला भेट दिली.

शिक्षण विभागाचे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष ; मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार दुर्दैवी :- अतुल मकाळ (सरपंच वैद्यकिन्ही)
—
१९५३ सालची शाळा असल्याने शाळेच्या ईमारतीची दुरावस्था झालेली आहे. शाळेच्या कार्यालयाच्या छताचे पोपडे कोसळुन लोखंडी गज ऊघडे पडलेले आहेत.४-५ वर्षांपासून वारंवार शिक्षण विभागाकडे शाळेच्या नविन ईमारत बांधकामासाठी निधी देण्यात यावा म्हणून पाठपुरावा केला आहे मात्र शासन आणि प्रशासनाला याचे गांभीर्य दिसून येत नाही. सध्या तिसरीचा वर्ग झाडाखाली भरविण्यात आला असुन एक दोन दिवसात ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. हा मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे सरपंच अतुल मकाळ यांनी सांगितले.

मुलांची काळजी वाटते ; सरकारच्या दुर्लक्षामुळे पालक खाजगी शाळेकडे पालकांचा ओढा:-  डॉ.सारीका माने ( पालक वैद्यकिन्ही)
—
काल रात्री घडलेल्या घटनेमुळे मुलांना शाळेत पाठवायची भिती वाटते. माझे शिक्षण याच शाळेत झाले आहे. शासनाचे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष असल्याने पालकांचा ओढा खाजगी शाळेकडे वळला आहे. शासन आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे पालक डॉ.सारीका माने यांनी सांगितले.

अजितदादा विमानतळ नको ; शाळांच्या ईमारतीसाठी निधी द्या :-  डॉ.गणेश ढवळे ( सामाजिक कार्यकर्ते)
—
बीड जिल्ह्यातील ३४९ शाळांमधील ५९२ वर्गखोल्या धोकादायक असुन विद्यार्थ्यांना त्यात अध्यापन करू नये अशा शिक्षण विभागाने सुचना दिलेल्या आहेत.परंतु नाईलाजाने विद्यार्थी आणि शिक्षक जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करत आहेत. पालकमंत्री अजितदादा पवार यांनी ५७५ कोटींचा निधी जिल्हा नियोजन विभागांसाठी मंजुर केला आहे परंतु अद्याप दिला नाही. मोडकळीस आलेल्या शाळांच्या ईमारतीसाठी निधी देण्याऐवजी विमानतळ बांधण्यासाठी अजितदादा आग्रही असुन त्यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

Back to top button