बीड

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असे उपक्रम आवश्यक: नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असे उपक्रम आवश्यक: नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

ल.ना.होशिंग विद्यालयात विद्यार्थिनींसाठी ‘एक संवाद’ पोलीस दलाचा अभिनव उपक्रम

जामखेड प्रतिनिधी: आजच्या काळात मुलींनी आत्मनिर्भर, सजग आणि सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी केले. त्या ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित ‘एक संवाद विद्यार्थीनींसाठी’ या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून बोलत होत्या.

दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि पोलीस अधिक्षक कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित ‘एक संवाद विद्यार्थीनींसाठी’ हा पोलीस दलाचा अभिनव उपक्रम जामखेड येथील ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवार (दि. ३०) रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी मिलिंद पोक्षे हे होते.

पुढे बोलताना चिंतामणी म्हणाल्या,
भविष्यातही अशा प्रकारचे मार्गदर्शनपर कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात आयोजित व्हावेत.अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या संकल्पनेतून खास विद्यार्थिनींसाठी आयोजित मार्गदर्शनाबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच मिलिंद पोक्षे, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रभावती कोकाटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल किरण ठुबे यांच्या सह पोलीस टीमचे आभार मानले.

यावेळी मिलिंद पोक्षे यांनी विद्यार्थिनींसाठी आत्मनिर्भरता, सुरक्षित जीवन, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक व सोशल मीडियावरील धोके याबाबत मार्गदर्शन केले. समस्या व त्रास झाल्यास त्वरित पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या व्याख्यानातून मुलींना सजग राहण्याची आणि यशस्वी जीवनाची दिशा मिळाली. महाराष्ट्रात पोक्षे यांनी २४ जिल्ह्यांत अकराशेहून अधिक व्याख्याने देऊन प्रबोधनाचे कार्य केले आहे.

या कार्यक्रमासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि गुप्तचर विभागाचे श्री जाधव यांच्या सह नगरसेविका नंदा होळकर उपस्थित होत्या. ल.ना.होशिंग माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, कार्यालयीन प्रमुख ईश्वर कोळी, कैलास वराट, नरेंद्र डहाळे, उमाकांत कुलकर्णी, साईप्रसाद भोसले व विद्यालयातील महिला अध्यापिका शिक्षिका प्रतिनिधी सुप्रिया घायतडक, संगिता दराडे, वंदना आल्हाट, पूजा भालेराव, स्वप्नाली घाडगे, रेश्मा कारंडे, प्रियंका सुपेकर, स्वाती हांगे, प्रभा आखाडे, शितल जगदाळे, स्वाती गिरी, मोहिनी जाधव आदी महिला अध्यापिका उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक व एन.सी.सी.विभागाचे प्रमुख अनिल देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कलाशिक्षक मुकुंद राऊत यांनी मानले.

Back to top button