संपादकीय

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक होणार चुरशीची

 

कोल्हापूर | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विकास संस्था गटात काही तालुक्यांत निवडणुका लागणार असल्याने उर्वरित नऊ जागा बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना पतसंस्था व प्रक्रिया संस्था गटात दिग्गजांनी दाखल केलेल्या अर्जामुळे खो बसण्याची शक्यता आहे. चर्चेत तोडगा न निघाल्यास या दोन गटांतच संघर्ष अटळ आहे. बँकेत प्रक्रिया संस्था गटात दोन, तर पतसंस्था गटातून एक संचालक निवडून द्यायचे आहेत.

विद्यमान संचालक मंडळात प्रक्रिया संस्था गटातून खासदार प्रा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, तर पतसंस्था गटातून अनिल पाटील प्रतिनिधित्‍व करीत आहेत. श्री. पाटील गेल्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमधून अवघ्या चार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी ‘जनसुराज्य’चे प्रा. जयंत पाटील यांचा पराभव केला. निवडणुकीनंतर मात्र श्री. पाटील हे सत्तारूढ गटाबरोबरच राहिले. त्यांचा अर्ज दाखल करतानाही बँकेचे अध्यक्ष ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक त्यांच्याबरोबर असल्याने त्यांना सत्तारूढ गटाचा पाठिंबा आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पतसंस्था गटातून ‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे यांनी पुन्हा प्रा. पाटील यांच्यासाठी आग्रह धरला आहे. त्याचवेळी नागरी बँक गटातून यापूर्वी संचालक राहिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनीही याच गटातून आज अर्ज दाखल केला. याशिवाय, दोन वर्षांपासून आमदार प्रकाश आबिटकर पतसंस्थांचा प्रश्‍न घेऊन संघर्ष करीत आहेत. त्यातून तेही पतसंस्थांच्या संपर्कात आले आहेत. या जोरावर त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर हेही याच गटातून अर्ज दाखल करणार आहेत. चर्चेतून श्री. आवाडे यांच्या उमेदवारीवर मार्ग निघू शकेल. पण, श्री. आबिटकर थांबणार का, हे महत्त्वाचे आहे.

Back to top button