संपादकीय

म म्हणजे मराठीच…..!

कुलाबा येथे घडलेला प्रकार सर्वांनी वृत्त वाहिन्यांवर पहिला असेल आणि त्यावर नक्कीच प्रतिक्रिया सुद्धा दिली असेल. पण महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठी बोला हे संगण्याइतपत आमची मराठी भाषा इतकी हलकी आहे का ? जरी आमचे मराठी बांधव तुमच्या दुकानात, व्यवसायात मेहनत करून काम करत असले तरी ते इमानदारीने महिनाभर काम करून त्याचा मोबदला घेऊन आपले घर चालवतात.

पण माझ्याकडे मराठी भाषिक व्यक्ती काम करतो तर ती मराठी भाषा सुद्धा गुलाम असेल असे वाटत असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी विसरताय आणि त्याची आठवण करून देण्यासाठी पुन्हा आम्हाला छत्रपतींच्या मावळ्यांच रूप घेण्यास आपण भाग पाडतांय, म्हणूनच आमच्या मराठी पक्षांनी तुम्हाला तुमची खरी जागा दाखवली.

हा एकच प्रकार फक्त महाराष्ट्रात खास करून मुंबई घडला असेल का? असे आपल्याला वाटत असेल तर आपण चुकतोय असे असंख्य मराठी माणसाला परप्रांतीयांकडून कमी लेखण्याचे प्रकार होतच असतात फक्त काही आपल्या पोटा-पाण्यासाठी सहन करतात कारण त्याच्यावर आपले घर चालते.

पण तो परप्रांतीय आपल्याला नोकरी देतो तर आपणही मेहनत करून त्याचा व्यवसाय नफ्यामध्ये आणतोच ना, मग यात तो आपल्याला पगार देतो म्हणजे आपलं घर त्याच्या मेहरबानीवर चालत असे होत नाही.

आज मुंबई फक्त बोलण्यापुरतीच मराठी माणसाची पण कुठे तर बदलापूर, अंबरनाथ, पनवेल आणि कामोठे ही आजच्या मराठी माणसाची मुंबई आणि दादर, लालबागमध्ये कोणाचे फ्लॅट तर परप्रांतीय लोकांचे, जे एकेकाळी पोट भरायला मुंबईत आलेले गुजराती, मारवाडी आज या मुंबईचे राजे झाले आहेत म्हणूनच मुंबईत त्यांची वाढलेली संख्या आज मुंबईच्या मातृभाषेला विरोध करत आहे. आज एक प्रकरण झालं आता पुन्हा पुढचं अजून एक प्रकरण मराठी भाषेचा होणारा अपमान, आणि मराठी माणूस सहन करणार आणि राग व्यक्त करत आपल्या कामात गुंग होणार…..!

Back to top button