📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लिंबागणेश येथील श्रीकृष्ण मंदिरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी

लिंबागणेश येथील श्रीकृष्ण मंदिरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी
लिंबागणेश :- (दि.०४) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात आज दि.०४ गुरुवार रोजी १२८ वी दत्त जयंती अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता तर फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण मंदिराला वेगळाच दिव्य आणि मंगलमय असा नजार मिळत होता.
दत्त जयंतीनिमित्त अभिषेक, महापूजा, आरती, दत्तयाग यांसह भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दत्त गुरूच्या जयघोषांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
हिंदू धर्मात दत्त जयंतीला विशेष महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाल्यामुळे दरवर्षी हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या संयुक्त अवतार म्हणून दत्तात्रेयांचे वर्णन धर्मग्रंथांत आढळते. गुरुपरंपरेला मानणाऱ्या भाविकांसाठी दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तींची पूजा केल्याइतके पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.
या दिवशी भक्तीपूर्ण उपासना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वातावरण शांती, सौभाग्याने परिपूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात किर्तनकारांनी भावस्पर्शी कीर्तन, भक्तिमय गाणी आणि दत्त तत्त्वज्ञानावरील मार्गदर्शन करून वातावरण अधिक पवित्र आणि आध्यात्मिक केले. उपस्थित भाविकांनी या भव्य आणि भक्तिरसपूर्ण सोहळ्याचा मनसोक्त लाभ घेतला.
Back to top button