बीड

आंनदग्रामच्या लेकरांची दिवाळी केल्याचा आनंदच वेगळा असतो – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

आंनदग्रामच्या लेकरांची दिवाळी केल्याचा आनंदच वेगळा असतो – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड दि.21(प्रतिनिधी)ः- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दरवर्षी आंनदग्राम येथील लेकरांची दिवाळी केल्याशिवाय स्वतः दिवाळी साजरी करत नाहीत. गेल्या 19 वर्षांपासून त्यांचा हा संकल्प आजही सुरू आहे. आण्णा आले की लेकरांच्या चेहर्‍यावर दिसणारा आंनद काही वेगळाच अनुभवता येतो. आमच्या अनाथांचा नाथ आमच्यात येऊन दरवर्षी आमच्या चिल्यापिल्याना काहींना काही घेऊनच येतो, त्या लेकरांनी आजही आंनद लुटला, त्यातच बीडच्या संगीत क्षेत्रात नावलौकिक असणारे कलाकार देखील आपली संगीत सेवा सादर करतात, आंनद ग्रामचा दिवाळी सणाचा हा आनंद असाच कायम राहो अशी सदिच्छा माजी मंत्री क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

दरवर्षीप्रमाणे गेल्या 19 वर्षापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे इन्फंट इंडिया या आनंदग्रामच्या संस्थेत जाऊन दिवाळी साजरी करत असतात. आजही लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे चिमुकल्यांसाठी झोपण्याकरता पलंग आणि दिवाळी साहित्य घेऊन आनंदग्राम वर पोहोचले. गाड्यांचा ताफा पोहोचल्यानंतर तेथील लहानग्यांनी अण्णा आले- अण्णा आले असे म्हणत अक्षरशः त्यांना बिलगून जात आपला पालक आपल्यासाठी आपल्या आनंदासाठी आजही आपल्याकडे आला आहे हे चेहर्‍यावरचे हावभाव त्यांचा आनंद सांगून जात होता. आनंदग्राम मधील साजरी झालेली ही दिवाळी आगळीवेगळीच होती. यावेळी जगदीश काळे, विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज मंझरीकर, नानासाहेब काकडे, सखाराम मस्के, तानाजी कदम, सुग्रीव रसाळ, चंद्रकांत पेंढारे, अरुण बोंगाणे, मनोज पाठक, जगन्नाथ मोरे, राजाभाऊ शेळके, दशरथ राऊत, दिलीप शेळके, अंबादास गुजर, दूध संघाचे कार्यकारी संचालक संतोष श्रीखंडे यांच्यासह बीड येथील नामांकित कलाकार भरत लोळगे, वेद मुळे, देव मुळे, महेश वाघमारे, तबला वादक नरहरी दळे, के.सी. चव्हाण यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी माजी मंत्री क्षीरसागर यांनी शेकडो मुलांसाठी दिलेल्या पलंगाचा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दीप प्रज्वलन करून संगीत रजनीला सुरुवात झाली. यावेळी येथील चिमुकल्यांनी माजी मंत्री क्षीरसागर यांचे स्वागत केले. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, दरवर्षी आनंदग्रामचा हा आनंदी क्षण आपण अनुभवत असतो, चिमुकल्या लेकरांची दिवाळी झाल्याशिवाय आपली दिवाळी साजरी झाल्याचे समाधानच होत नाही. बारगजे कुटुंबीय सगळेच या प्रकल्पासाठी मनोभावे सेवा करतात. रात्र-दिवस झटतात,त्यांना मदत व्हावी लेकरांची अडचण सुटावी यासाठी खारीचा वाटा आपण उचलत असतो. हे आपले भाग्य आहे हे पुंण्याचे काम आहे अशी माणसे शोधूनही सापडत नाहीत. मुलांची मानसिक अवहेलना, कुचंबांना होऊ नये याची काळजी या ठिकाणी घेतली जाते. येथील लहानग्यांनी दिवाळीसाठी लागणार्‍या विविध वस्तू तयार करून 53 हजार रुपये वस्तूंची विक्री केली हे कौतुकास्पद आहे. ज्यांना कोणी स्वीकारत नाही अशांचा स्वीकार करून बारगजे कुटुंबीय लाख मोलाचे काम करत आहे. हा सेवाभाव माणसाच्या मनात असणे खूप महत्त्वाचे आहे मुलांना झोपण्यासाठी पलंगाची गरज होती ती आज पूर्ण झाली आहे. इथे सर्व जाती धर्मातील मुले असतात जातीचे राजकारण करणार्‍यांनी थोडेसे इकडे जर पाहिले तर आपण कोणत्या विश्वात आहोत याची जाणीव होईल. लहानग्यांच्या वेदना जाणून घेत त्यांच्या आनंदात आपण सहभागी व्हावे. मनाला एक वेगळाच आंनद मिळेल,समाजातून बाहेर टाकलेल्या चिमुकल्या साठी जे-जे करता येईल ते आपण करणार आहोत असे सांगून माजी मंत्री क्षीरसागर यांनी संगीत गायनाचे श्रवण केले. यावेळी संचालक दत्ता बारगजे यांनीही अण्णांनी केलेल्या आजपर्यंतच्या सहकार्याची आठवण करून दिली. येथील अनाथ मुलांना अण्णांचं नाथ झाले म्हणून आज आम्ही येथे सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. यावेळी परिसरातील गावातून अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Back to top button