बीड
मंथन परिक्षेत सवासेवाडी शाळेचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत चिंचवण केंद्राची उत्तुंग भरारी कौतुकास्पद

मंथन परिक्षेत सवासेवाडी शाळेचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत
चिंचवण केंद्राची उत्तुंग भरारी कौतुकास्पद
वडवणी,दि.१५(प्रतिनिधी):- मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवासेवाडी शाळेचा अथर्व नागरगोजे राज्य गुणवत्ता यादीत तर तनिष्क बडे विभागीय गुणवत्ता यादीत अव्वलस्थानी आले असून या परिक्षेत सवासेवाडी शाळेचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यावरुन परत एकदा चिंचवण केंद्राची उत्तुंग भरारी कौतुकास्पद असल्याचे दिसून येते.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा २०२५ जानेवारीमध्ये महाराणी ताराबाई माध्यमिक विद्यालय वडवणी येथे घेण्यात आलेल्या परिक्षेत चिंचवण केंद्रातील सवासेवाडी शाळेतील विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. त्या परिक्षेत या शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गातील चि.अथर्व बंडू नागरगोजे याने ३०० पैकी २९२ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळवला आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोन्नाखोटा शाळेतील चौथीचीच विद्यार्थीनी कु.तनिष्का उध्दव बडे हिने या परिक्षेत ३०० पैकी २९० गुण मिळवून विभागीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवासेवाडी शाळेतीलच इयत्ता पहिलीचा विद्यार्थी चि.महेश लक्ष्मण वडणे याने केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. इयत्ता तिसरीमध्ये कु.संस्कृती रमेश सवासे हिने केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला असून याच वर्गातील चि.विराट गणेश मुंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. इयत्ता चौथीमध्ये कु.प्रणाली ईश्वर सवासे हिने केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक प्राप्त केला आहे. तर इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थिनी कु.आराध्या नागरगोजे हिने केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. अशाप्रकारे दैदिप्यमान यश या परिक्षेत मिळवल्याने संपूर्ण वडवणी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात चिंचवण केंद्राने परत एकदा उत्तुंग भरारी घेत कौतुकास पात्र ठरले आहेत. दरम्यान मंथन परिक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबध्दल सर्व विद्यार्थ्यांचे वडवणी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे, चिंचवण केंद्राचे केंद्रप्रमुख तथा केंद्रिय मुख्याध्यापक सुनिल मुंडे, सोन्नाखोटा शाळेचे मुख्याध्यापक ए.आर.मुंडे सवासेवाडी शाळेचे मुख्याध्यापक पवन आरसेवार व सहशिक्षक बंडू नागरगोजे, उध्दव बडे, गोरक्षनाथ मुंडे, विष्णू आंधळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



