बीडब्रेकिंगसंपादकीय

दोनशे किराणा किट वाटप करून ओस्तवाल दाम्पत्याने गरजूंना आधार दिला

अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) कोरोना संक्रमानामुळे लॉक डाऊन लागले. यामुळे व्यापार – धंदे सर्व बंद पडले. त्यामुळे सामान्य नागरिकाचा हात बंद झाला आहे. अशा अडचणीच्या काळामध्ये प्रत्येकाने एक दुसऱ्याला मदत करायला हवी. मात्र मदतीचे हात कमी झाले आहेत. त्यातच प्रयास फाउंडेशन मुंबई आणि श्री गुरु आनंद महिला प्रतिष्ठान च्या वतीने आज शिरस मार्ग येथे दोनशे गरजू कुटुंबांना एक महिने पुरेल एवढा किराणा वाटप करण्यात येत आहे. ही बाब निश्चितच चांगली आहे. ओस्तवाल दांपत्याने हाती घेतलेले काम गरिबांसाठी आधार ठरले असल्याचे मत ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले.

शिरस मार्ग येथे प्रयास फाउंडेशन आणि श्री गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किराणा कीट वाटपाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्योदयचे संपादक गंगाधर काळकुटे, मुख्याध्यापक सुभाष पवळ, माजी सरपंच सोमेश्वर गचांडे, सुहास पवळ, संतोष गवळी हे हजर होते.

अँड. देशमुख पुढे म्हणाले की, कोरोनाला घाबरू नका. लक्षण दिसले की, लगेच तपासा. हा आजार कोरोना केअर सेंटर मध्येच मोफत उपचारात बरा होतो. मात्र अंगावर दुखणे काढले तर लाखो रुपये खर्च होतात. शरीराला त्रासही होतो. त्यामुळे प्रत्येकाने लक्षण दिसले की, लगेच तपासून घ्यावे, असेही ते म्हणाले.

सूर्योदयचे संपादक गंगाधर काळकुटे म्हणाले की, बीडच्या डॉक्टरांनी पात्र लोकांची निवड करून शिरस मार्ग येथे दोनशे किट वाटप केल्या. माणसाजवळ किती आहे, यापेक्षा त्याची देण्याची दानत किती आहे, हे महत्वाचे आहे. सर्व हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर मनोज ओस्तवाल आणि सीमा ओस्तवाल यांचे हे काम जनता विसरणार नाही. दरवर्षी काही ना काही वाटप करण्याची त्यांची परंपरा उज्वल असल्याचेही काळकुटे यांनी म्हटले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सीमा ओस्तवाल यांनी केले. कार्यक्रम घेण्या मागची त्यांची भूमिका त्यांनी विशद केली. तसेच प्रयास फाउंडेशन आणि गुरु आनंद महिला प्रतिष्ठान तर्फे हे वाटप करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कामात प्रतिष्ठान घेत असलेली मेहनत त्यांनी यावेळी विशद केली.

यावेळी सुहास पवळ यांच्यासह अन्य वक्त्यांनी आपले विचार मांडले. शिरस मार्ग येथील दोनशे पात्र लाभार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. अत्यंत शांततेत सर्वांना किट वाटप करण्यात आल्या. कोरोणा नियमाचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर मनोज ओस्तवाल व सीमा ओस्तवाल यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतराव तांबारे यांनी केले.

Back to top button