बीड

श्री क्षेत्र नारायण गड एकता अन् समतेचे प्रतिक- उत्तराधिकारी संभाजी महाराज 

श्री क्षेत्र नारायण गड एकता अन् समतेचे प्रतिक- उत्तराधिकारी संभाजी महाराज
 सन्मार्गाने भाविकांनी मार्गक्रमण करावे – उत्तराधिकारी हभप संभाजी महाराज
कोळगाव बाळासाहेब घाडगे – क्षेत्र नारायण गड महाराष्ट्रात अध्यात्मिक क्षेत्रात अधिष्ठाण असलेले संस्थान आहे श्री क्षेत्र नारायण गडाचे भाविक, वारकरी हे सर्व धर्म व जातींमधील असून श्री क्षेत्र नारायण गड हे अध्यात्मा बरोबरच  एकतेचे अन् समतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन नारायण गडाचे उत्तराधिकारी महंत संभाजी महाराज यांनी केले.
     बीड जिल्ह्यातील असणारे श्री क्षेत्र नारायणगड संस्थान चे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राक्षसभूवन येथे होत असलेल्या नारळी सप्ताहातील सहाव्या दिवशीच्या दि.१५ एप्रिल २०२५ रोजी प्रवचन सेवेत हभप संभाजी महाराज बोलत होते.
गेल्या सहा दिवसांपासून राक्षसभूवन येथे नारायण गडचा ७३ वा अखंड हरिनाम नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू असून लाखो भाविकांनी येथे प्रवचन, कीर्तन, रामकथा श्रवण करत आहेत. सहाव्या दिवशी महंत संभाजी महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी संभाजी महाराज म्हणाले, की साधू-संत हे आपले जीवन जगाच्या कल्याणासाठी व्यतीत करतात. त्यागाच्या आधारावर ते जगाला सन्मार्ग दाखवतात, जगण्यासाठीचा जो सन्मार्ग संत तुकाराम महाराज यांनी दाखवला आहे. या सन्मार्गाने भाविकांनी मार्गक्रमण करावे असेही हभप संभाजी महाराज म्हणाले. राक्षसभूवन येथे ज्ञानगंगा व भक्तीगंगा अवतरली आहे, हे नगद नारायण महाराजांचे स्वरूप आहे. या सप्ताहात आनंद घ्या व जीवन जगताना इतरांना आनंद द्या, हा आनंद देणं हेच खरे पुण्य असल्याचेही संभाजी महाराज म्हणाले. या सप्ताहात परिपाक म्हणजे अनेकजण यातून व्यसनमुक्त होतात, समाजाला सन्मार्ग दाखवला जातो, समाजाला अध्यात्मा बरोबरच शिक्षणाचा मार्ग दाखवून समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे कामही सप्ताहातून होते. समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे काम सर्वच साधुसंतांनी केले आहे, हे साधुसंत पूजनीय व वर्णनिय आहेत, संत उदार आहेत, अशा संतमहंतांची संगती असूद्या असेही संभाजी महाराज म्हणाले. यावेळी प्रवचनास हभप रंगनाथ महाराज सुरळेगावकर, हभप सिद्धेश्वर महाराज गाडे,गोरक्ष महाराज भिल्लारे ह भ प भागवत म गंगाधर, श्रीरंग म डोंगरे, लक्ष्मण महाराज तकिक, श्रीकुमार महाराज ठोसर, ब्रम्हदेव महाराज, तांबे महाराज यांच्यासह महिला पुरूष भाविकांची मोठी उपस्थिती होती.
…………
चौकट
 महाप्रसादाची जय्यत तयारी १११ क्विंटलचा होणार महाप्रसाद…..
राक्षसभूवन येथे सुरू असलेल्या या नारळी सप्ताहची उद्या गुरुवार दि.१७ एप्रिल रोजी मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या तीन दिवसांपासून १११ क्विंटल साखरेपासून बुंदीचा महाप्रसाद तयार केला जात आहे. महाप्रसाद तयार करण्याचे काम अंतीम टप्यात आल्याची माहिती सप्ताह कमेटीतील कल्याण काका तांबे, प्रा.दादासाहेब खोले,  रविंद्र तांबे, आण्णा तांबे यांनी दिली.
Back to top button