बीड

आदिवासी-भटके विमुक्त समाजाला स्थानिक स्वराज्यात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे – सुजात आंबेडकर

आदिवासी-भटके विमुक्त समाजाला स्थानिक स्वराज्यात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे – सुजात आंबेडकर

जामखेड मध्ये राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी-आगामी काळात कर्जत / जामखेड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीमध्ये आदिवासी-भटके विमुक्त समाजाला स्थानिक स्वराज्यात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे , असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

ग्रामीण विकास केंद्र जामखेड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने जामखेड येथील महावीर मंगल कार्यालयात भटके स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भटके विमुक्तांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, आदिवासी नेते अनिल जाधव, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे नंदू मोरे,लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, भटके-विमुक्तांचे नेते अंबर चव्हाण, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अशोक आव्हाड,मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहर भाई काझी,मुख्तार सय्यद,तालुकाध्यक्ष आतिश पारवे,सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले,माजी सरपंच समीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, वेळप्रसंगी समविचारी पक्ष व संघटनांना सोबत घेऊन आपण कर्जत जामखेड तालुक्यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक का मोठ्या उत्साहाच्या वातावरणात लढवायच्या आहेत. येथून पुढे आपले प्रश्न आता आपल्यालाच मांडावे लागणार आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आपले हक्काचे विचारपीठ सर्वांसाठी उपलब्ध आहे. आपल्याला आपल्याला गुन्हेगार कोणी बनवले ? स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील आपले प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. या बाबत आपण सरकारला जाब विचारला पाहिजे असे ते म्हणाले.

मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मायक्रो ओबीसींचे २३ उमेदवार उभे केले होते. याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली. दलित आदिवासी व भटक्या विमुक्तांवरील अन्याय दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा आपण एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशींची केस अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः कोर्टात वकील म्हणून उभा राहून जिंकली. अशा अनेक लढाया आपल्याला भविष्यकाळात लढायच्या आहेत आणि त्या जिंकायचे आहेत असे ते असेही ते म्हणाले.
यावेळी ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की, आपल्याला आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल, आणि प्रस्थापितांची गुलामी करायची नसेल तर त्यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब होय. तुमच्या आमच्यासारख्या रस्त्यावर लढणाऱ्या अनेक सर्वसामान्य कुटुंबाची जबाबदारी आणि काळजी आंबेडकर घराण्याने घेतली आहे. त्यामुळे इथून पुढे इतर कुणाशीही पंगा घ्या, मात्र आंबेडकर घराण्याची कदापिही पंगा घेऊ नका असा कडक इशारा त्यांनी प्रस्थापितांना दिला.

यावेळी प्रा.किसन चव्हाण,अनिल जाधव, नंदू मोरे, भटके-विमुक्तांचे नेते अंबर चव्हाण यांचीही भाषणे झाली.
भटके-विमुक्त, आदिवासी संयोजन समितीच्या सदस्या उमाताई जाधव यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी ललिता पवार, लता सावंत, पल्लवी शेलार, रेश्मा बागवान व शितल पवार यांनी विविध ठरावांचे वाचन केले. बापूसाहेब ओव्होळ, राजू शिंदे, तुकाराम पवार यांनी कर्जत जामखेड तालुक्यातील भटके विमुक्तांच्या संशोधन अहवालाचे वाचन केले. सकाळी ११.०० वाजता जामखेड येथील तहसील कार्यालयापासून रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये बहुरूपी, गोसावी, उमाजी नाईक वेशभूषा, वासुदेव, मरी आईवाला, पोतराज, नंदीवाले, कुरमुडी जोशी, स्मशान जोगी, फासेपारधी, वैदु, उंटवाले, जोशी, वाघ्या मुरळी, मदारी, भोई, डोंबारी, कैकाडी, आदी समाज बांधव सहभागी झाले होते.
महावीर मंगल कार्यालयातील विचार पिठावर सुप्रसिद्ध शाहीर शितल साठे व सचिन माळी आणि सहकाऱ्यांचा नवयान आंबेडकरी जलसा सादर झाला. या परिषदेमध्ये मुस्लिम पंच कमिटी, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी,प्रहार संघटना यांच्या सह समविचारी पक्ष आणि संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल पवार, सोमनाथ भैलुमे, सुरेखाताई सदाफुले,वैजिनाथ केसकर, सचिन भिंगारदिवे, संतोष चव्हाण,मच्छिंद्र जाधव, ऋषिकेश गायकवाड, रामदास गायकवाड, संदीप आखाडे,अशोक मोरे,अंकुश पवार, कल्याण आव्हाड, कांतीलाल जाधव, राहुल पवार, शब्बीर भोसले, डीसेना पवार, भिमराव सुरवसे , सचिन चव्हाण,उर्मिला कवडे, मंगल शिंगाने, शितल काळे, आसाराम काळे, अविनाश काळे, गणपत कराळे, नरसिंग भोसले, सिनिता कांबळे, लाला वाळके,जाकीर तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दादासाहेब शिंदे यांनी केले तर आभारप्रदर्शन संतोष चव्हाण यांनी मानले.

Back to top button