बीड

शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या नफेखोरांना चपराक! तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा खाजगी शाळांना फी पारदर्शकतेचा कडक इशारा

शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या नफेखोरांना चपराक! तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा खाजगी शाळांना फी पारदर्शकतेचा कडक इशारा
​”शिक्षण हा नफा कमावण्याचा धंदा नाही, तर समाज घडवण्याचे पवित्र कार्य”; पालकांची दुहेरी लूट थांबवण्यासाठी कठोर पावले
​ सुहास सावंत (विशेष प्रतिनिधी): तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी घेतलेला निर्णय अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद आहे. त्यांनी राज्यातील सर्व खाजगी शाळांना आपल्या फी संरचनेचा तात्काळ आढावा घेऊन ती माहिती शाळेच्या मुख्य नोटीस बोर्डवर आणि अधिकृत वेबसाईटवर स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे कडक आदेश दिले आहेत. “शिक्षण हे नफा कमावण्यासाठी नसून समाज घडवण्याचे पवित्र कार्य आहे”, हा त्यांचा संदेश आजच्या काळातील नफेखोरांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरात शिक्षणाच्या नावाखाली चालणाऱ्या नफेखोरीच्या दलालांच्या शाळांवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
​शाळा हे ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे मंदिर आहे. मात्र, आज खाजगी व्यावसायिक आणि भांडवलदार शाळेच्या माध्यमातून दुप्पट नफा कमावण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करत आहेत. खाजगी इंग्लिश स्कूल आणि कॉन्व्हेंट शाळांमध्ये आज प्रत्यक्ष गुणवत्तेपेक्षा बाह्य फॅशनला अवाजवी महत्त्व दिले जाते. सूट, बूट, टाय, जॅकेट, महागड्या पुस्तकांचा सक्तीचा खर्च आणि ‘अमुक डे’, ‘तमुक डे’ च्या नावाखाली पालकांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकणारी टोळी शिक्षण क्षेत्रात सक्रिय झाली आहे.
​दुसरीकडे प्रत्यक्ष शैक्षणिक गुणवत्तेच्या नावाने मोठी बोंबाबोंब असताना, स्वतःच्या जाहिरातबाजीवरती मात्र लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. ‘हा पॅटर्न’ आणि ‘तो पॅटर्न’ अशी आकर्षक नावे देऊन पालकांकडून भरघोस फी वसूल केली जाते. बहुतांश वेळा मुलांच्या सुरक्षेचा विषय आणि त्यांच्या वास्तविक गुणवत्तेचा विषय याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. आम्ही भौतिक सुविधा किती चकचकीत आणि आलिशान देतो, यावरच या संस्थांचा संपूर्ण भर असतो.
​मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी मनापासून प्रयत्न करणाऱ्या शिक्षण संस्था आजच्या काळात खूप कमी आहेत. दुर्दैवाने, आज पालकांमध्येही ‘मी माझ्या मुलाला किती महागड्या शाळेत शिकवतो’ हे दाखवण्यासाठी समाजात एक वेगळीच स्पर्धा लागलेली आहे. शाळेला भरमसाठ फी भरल्यानंतरही पुन्हा खाजगी शिकवण्या लावाव्या लागतात आणि विशेष म्हणजे त्या बहुतांश वेळा त्याच शाळेतील शिक्षकांच्याच असतात; म्हणजेच पालकांची होणारी ही दुहेरी लूट आहे, याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. या शाळांचे ठरलेले आर्थिक गणित हे सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेरचे आहे.
​या व्यावसायिक शाळांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जर विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाला तर त्याचे पूर्ण श्रेय लाटायला या शाळा सर्वात पुढे असतात आणि त्याचे मोठे होर्डिंग्ज लावतात. परंतु, जर तोच विद्यार्थी अपयशी झाला तर त्याचे खापर थेट पालकांच्या संगोपनावर आणि विद्यार्थ्याच्या क्षमतेवर फोडून शाळा आपले हात झटकून मोकळी होते.
​काही शाळा नक्कीच चांगल्या देखील आहेत, ज्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळत आहे. सगळेच चुकीचे आहेत असे म्हणता येणार नाही, मात्र जे नफेखोर आणि चुकीचे आहेत त्यांना या शैक्षणिक व्यवस्थेतून बाजूला काढणे अत्यंत गरजेचे आहे.
​आजकाल लोकांना प्रत्यक्ष गुणवत्तेपेक्षा बाहेरील भंपकपणावर आणि चकचकाटावर जास्त विश्वास बसतो, पण शेवटी आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्यानंतर वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच, वेळ निघून जाण्याच्या अगोदर शिक्षणाच्या बाजारीकरणातील या दलालांना ओळखा आणि आपली फसवणूक होणार नाही याची संपूर्ण काळजी घ्या, असा इशारा या बातमीच्या माध्यमातून सर्वसामान्य पालकांना देण्यात येत आहे.
Back to top button