प्रवीण बागडे यांची स्वीय सहाय्यकपदी पदोन्नती

नागपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूर येथील कुलगुरू कार्यालयात कार्यरत प्रवीण मोरेश्वर बागडे यांची स्वीय सहाय्यक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने नुकत्याच निर्गमित केलेल्या पदोन्नती आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते आज संचालनालय, विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर येथे नव्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
प्रवीण बागडे यांना प्रशासकीय क्षेत्रातील तब्बल २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. महाराष्ट्र शासनातील अनेक मंत्री व राज्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तसेच विशेष कार्य अधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपाल यांच्या नागपूर दौऱ्यांदरम्यानही त्यांनी प्रतिनियुक्तीवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
माफसूमधील विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत कर्तव्यनिष्ठेने आणि कार्यक्षमतेने सांभाळल्या आहेत. शिस्तबद्ध कार्यपद्धती, उत्कृष्ट समन्वय कौशल्य आणि गुणवत्तापूर्ण सेवेमुळे त्यांनी विद्यापीठ प्रशासनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या सेवेला ही पदोन्नती म्हणजे योग्य पावती मानली जात आहे. यापूर्वी विद्यापीठात त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना ‘उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार’ तसेच ‘उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले आहेत.
प्रशासनाबरोबरच प्रवीण बागडे हे साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या ४८८ लेखांचे प्रकाशन झाले असून, लोकमत टाइम्समधील ‘सिटी टॉक्स’ या सदरात १०५ हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच दैनिक नवे शहर (मुंबई) मधील ‘वाचक संवाद’ या सदरात त्यांच्या अनेक मुलाखती प्रकाशित झाल्या आहेत. सामाजिक समता, मानवता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय लोकमित्र पुरस्कार, गांधी-आंबेडकर पुरस्कार, भारतीय एकता पुरस्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार, उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार, प्रबुद्ध साहित्यरत्न पुरस्कार, राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.



