बीड

जीवन सुखी करण्यासाठी अहंकाराचा त्याग करा: अनुराधा दीदी पंढरपूरकर

जीवन सुखी करण्यासाठी अहंकाराचा त्याग करा: अनुराधा दीदी पंढरपूरकर

*स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचा उपक्रम:**
*बीडमधील कीर्तन महोत्सवात ‘पांडुरंग अष्टक’ कथेचे निरूपण*
बीड, दि. २८ (प्रतिनिधी): जीवनाचे अंतिम सत्य जाणण्यासाठी परमार्थ आवश्यक आहे आणि त्यासाठीच वारी करायची असते. जीवन सुखी, समाधानी आणि समृद्ध करायचे असेल, तर सर्वप्रथम मनातील अहंकाराचा त्याग करायला शिका. त्यातूनच जीवनाचे खरे मर्म समजेल. मानवी जीवनात विनम्रता हीच सर्वात महत्त्वाची शिदोरी आहे, असे प्रतिपादन निरूपणकार अनुराधा दीदी पंढरपूरकर यांनी केले.
येथील स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी वारीच्या औचित्यावर शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य ‘कीर्तन महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ‘पांडुरंग अष्टक’ या संगीतमय कथेची गुंफण करताना अनुराधा दीदी रविवारी बोलत होत्या. या प्रसंगी त्यांनी विविध संतांच्या अभ्यासपूर्ण अभंगांचे दाखले देत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खटोड प्रतिष्ठानच्या वतीने गौतम खटोड यांच्या हस्ते निरूपणकार अनुराधा दीदी पंढरपूरकर यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.
जगद्गुरु शंकराचार्यांनी ‘पांडुरंग अष्टक’ या स्तोत्रातून पांडुरंगाच्या भक्तीचे जे अद्भूत वर्णन केले आहे, त्याचा उलगडा दीदींनी भाविकांसमोर केला. पंढरीचा पांडुरंग परमात्मा विटेवर कमरेवर हात ठेवून उभा आहे, तो केवळ आपल्या भक्तांच्या भेटीसाठी आतुर आहे. पंढरपूर हे असे पावन तीर्थक्षेत्र आहे, जिथे पोहोचल्यानंतर पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताच्या पाठीशी उभा राहून त्याची सर्व चिंता मिटवतो, असे शंकराचार्यांनी लिहून ठेवल्याचे दीदींनी सांगितले.
भगवंताने कमरेवर हात ठेवण्यामागच्या भावपूर्ण कथा अनुराधा दीदींनी विस्ताराने सांगितल्या. त्या म्हणाल्या, धर्मराजांनी केलेल्या राजसूय यज्ञासाठी स्वतः भगवंताने मदत केली होती. या कार्यातून सात दिवस विश्रांती घेतल्यानंतर भगवंतांनी कमरेवर हात ठेवले. तसेच, भगवंतासारखा सारथी संपूर्ण विश्वात होणे नाही. युद्धात अर्जुनाचे सारथ्य करण्याचे महान कार्य केवळ कृष्णच करू जाणे. एवढेच नव्हे तर, श्री संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवंत परमात्मा स्वतः ‘श्रीखंड्या’च्या रूपात कावडीने पाणी भरण्यापासून सर्व कष्टाची कामे करत होते. भक्तासाठी देव स्वतः कष्ट उपसतो, याची प्रचिती त्यांनी दिली.
ज्याच्या केवळ स्मरणाने मनुष्याचे अंतःकरण शुद्ध होते, तो पांडुरंग परमात्मा नाथांच्या घरी तब्बल १२ वर्षे सेवा करत होता. या अखंड सेवेमुळे भगवंताला आलेला थकवा दूर करण्यासाठी त्यांनी कमरेवर हात ठेवले, असा संतांच्या कल्पनेचा आणि भावाचा सुंदर उल्लेख ‘पांडुरंग अष्टक’ मध्ये आढळतो. पंढरपूर हे असे तीर्थक्षेत्र आहे, जिथे लाखो भाविक भगवंताचे रूप डोळ्यात साठवून स्वतःला विसरून जातात. म्हणूनच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवली पाहिजे, असे आवाहन अनुराधा पंढरपूरकर यांनी केले. या सुश्राव्य कथेचे श्रवण करण्यासाठी बीडमधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण नाट्यगृह विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले होते.
Back to top button