📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मोमीनपुरात पुन्हा गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ४७ गोवंशांची सुटका, प्रशासनाने आता कायमस्वरूपी लगाम घालावा!

मोमीनपुरात पुन्हा गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ४७ गोवंशांची सुटका, प्रशासनाने आता कायमस्वरूपी लगाम घालावा!
पेठ बीड पोलिसांची पहाटे धडक कारवाई; सात लाखांचा गोवंश ताब्यात, शहरात खळबळ
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील मोमीनपुरा परिसर पुन्हा एकदा गोवंश तस्करीच्या गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आला असून पेठ बीड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ४७ गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून “मोमीनपुरा परिसर गोवंश तस्करीचे केंद्र बनत चालले आहे का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
पेठ बीड पोलिसांना मोमीनपुरा परिसरातील कुरेशी मोहल्ल्यात मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीसाठी आणल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार १२ मे रोजी पहाटे १ ते सकाळी ६ वाजेदरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात परिसरात छापा टाकला. तपासणीदरम्यान तब्बल ४७ गोवंश आढळून आल्या. प्राथमिक चौकशीत या गोवंश कत्तलीसाठी आणण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेत सुटका केली. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची किंमत अंदाजे सात लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे मोमीनपुरा परिसरात यापूर्वीही गोवंश तस्करी, अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठी साठा केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अनेक वेळा पोलिसांकडून आणि पशुप्रेमी संघटनांकडून कारवाया होऊनही पुन्हा अशा घटना समोर येत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ कारवाई करून चालणार नाही, तर या संपूर्ण साखळीमागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही काही तस्करांकडून गुप्तपणे गोवंश वाहतूक आणि कत्तलीचे प्रकार सुरू असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी गोवंशांची अवैध ने-आण, शहरातील दाट वस्त्यांमध्ये त्यांचा साठा आणि त्यानंतर होणारी कत्तल ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. यामुळे केवळ कायद्याचे उल्लंघन होत नसून सामाजिक वातावरणही दूषित होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
गौरक्षक दल, विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच पशुप्रेमी संघटनांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. शहरात वाढणाऱ्या गोवंश तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी, संशयित भागांवर सतत नजर ठेवावी तसेच अशा प्रकारातील आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून जलद कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र तरीदेखील अशा घटना थांबत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गोवंशांची अमानुष पद्धतीने वाहतूक आणि कत्तलीसाठी त्यांना ठेवले जाणे ही केवळ कायदेशीर नव्हे तर नैतिक दृष्ट्याही गंभीर बाब असल्याचे मत सामाजिक स्तरातून व्यक्त केले जात आहे. “गोमाता” म्हणून पूजल्या जाणाऱ्या जनावरांचे संरक्षण करण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून संपूर्ण समाजाची आहे. त्यामुळे अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उपअधीक्षक व्यंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक वैभव पाटील, एपीआय उबाळे, एपीआय पुजारी, पीएसआय बारगळ, पोलीस हवालदार मोठे, राठोड, सिकेतोड, गुजर, ओव्हाळ, राख, भोजे तसेच आरसीपी पथकातील पोलीस हवालदार गायकवाड आणि इतर कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.
पेठ बीड पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात असले तरी “अशा कारवाया तात्पुरत्या न राहता कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात,” अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गोवंश तस्करीचे जाळे मोडून काढण्यासाठी प्रशासनाने आता अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.
Back to top button