सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण
पाटोदा (ग) शाळेला अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह पॅनलची भेट
जामखेड प्रतिनिधी: तालुक्यातील पाटोदा (ग.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. प्रा.राम शिंदे यांच्या सौजन्याने अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह बोर्ड, वायरलेस कीबोर्ड, वायरलेस माउस तसेच युपीएस भेट स्वरूपात प्राप्त झाला आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळणार आहे.
पाटोदा गावातील भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. सध्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण १३२ विद्यार्थी शिक्षण घेत असून पाच शिक्षक कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यापन अधिक प्रभावी व्हावे आणि विद्यार्थ्यांचा दर्जा उंचवावा, या उद्देशाने हा पाठपुरावा करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड मिळावी, माहिती-तंत्रज्ञानाशी त्यांची ओळख व्हावी आणि अध्यापन अधिक परिणामकारक व्हावे या दृष्टीने इंटरॅक्टिव्ह पॅनलची आवश्यकता ओळखून हा संच उपलब्ध करून दिला. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.या लोकहितकारी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी प्रा.राम शिंदे तसेच पाठपुरावा करणाऱ्या भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांचे आभार मानले.



