📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

चंदन तस्करीप्रकरणी सात जण जेरबंद परळी ग्रामीण हद्दीत ₹8.21 लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदन तस्करीप्रकरणी सात जण जेरबंद
परळी ग्रामीण हद्दीत ₹8.21 लाखांचा मुद्देमाल जप्त
परळी (प्रतिनिधी) – परळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधित चंदनाच्या बेकायदेशीर तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना ताब्यात घेतले असून एकूण ₹8 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
दि. 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे (अंबाजोगाई) यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे धर्मापुरी ते पानगाव रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या गायराण जमिनीत काही इसम विनापरवाना प्रतिबंधित चंदनाची खरेदी-विक्री व वाहतूक करीत आहेत. या खात्रीलायक माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ पथक रवाना केले.
रात्री सुमारे 9 वाजता संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला. छाप्यात आरोपी विनापरवाना चंदनाची तस्करी करताना रंगेहात मिळून आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पप्पु बाबुराव सूर्यवंशी (वय 40), राहुल पप्पु सूर्यवंशी (वय 23), तेजस कल्लप्पा कांळीबे (वय 25, रा. अशोकनगर, परळी वै.), नितीन सटवा जाधव (वय 22, रा. हनुमाननगर, परळी वै.), अविनाश व्यंकट जाधव (वय 23), व्यंकट रामचंद्र जाधव (वय 45, दोघे रा. फुलेनगर, उदगीर, जि. लातूर) व भारत निवृत्ती गायकवाड (वय 40, रा. नाकलगाव, ता. माजलगाव) यांचा समावेश आहे.
या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून 104 किलो चंदन लाकूड (किंमत ₹2,60,000), 39 किलो चंदन साल (₹39,000), टाटा इंडिगो चारचाकी वाहन व दुचाकी वाहने (अंदाजे ₹1,60,000), एक विनानंबर दुचाकी (₹20,000), सात मोबाईल फोन, लोखंडी तराजू व वाकस (₹1,000) असा एकूण ₹8,21,000 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार क्रमांक 2169 सतेश कांगणे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 12/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 317(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक असद शेख, पोलीस उपनिरीक्षक निमोने, पोलीस हवालदार बासर, बिक्कड, सतेश कांगणे, सफौ. सोडगीर तसेच पोलीस अंमलदार उत्तरेश्वर केदार व खंदारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Back to top button