बीड

लिंबागणेश ग्रामपंचायतीचा युवा शेतकरी संघर्ष समितीच्या ऊस दरवाढीसाठी “कोयता बंद”आंदोलनाला पाठिंबा :- डॉ. गणेश ढवळे

लिंबागणेश ग्रामपंचायतीचा युवा शेतकरी संघर्ष समितीच्या ऊस दरवाढीसाठी “कोयता बंद”आंदोलनाला पाठिंबा
:- डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश :- (दि. २८)
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, तसेच हंगामासाठी न्याय्य भाव निश्चित करण्यात यावा, या मुख्य मागण्यांसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ऊसतोडणी बंद आणि ऊसवाहतूक बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायतीने अधिकृत ठराव घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बालासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, रमेश गायकवाड, महादेव कुदळे,अर्जुन घोलप, समीर शेख व अँड . गणेश वाणी,सुरेश निर्मळ, दादा गायकवाड,  संतोष भोसले,नामदेव वाणी, संजय पावले, विनायक वाणी, शिवाजी वाणी, सिताराम थोरात, भगवान थोरात आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने एकमताने हा ठराव पारित केला. संबंधित निवेदन जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजितदादा पवार आणि विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना पाठवण्यात आले आहे.
युवा शेतकरी संघर्ष समितीचे जगदीश फरताडे, मोहन जाधव आणि सहकारी यांनी सांगितले की, साखर कारखानदार ऊसाला समाधानकारक दर देण्यात अपयशी ठरत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३००० रुपये उचल दर आणि ४००० रुपये अंतिम बिल देण्यात यावे, या न्याय्य मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून विविध तालुक्यांमध्ये आंदोलन सुरू आहे.
आंदोलनादरम्यान प्रशासन आणि कारखानदारांच्या वतीने केवळ बैठका घेतल्या जात असून कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
शेतकरी हिताच्या प्रश्नावर प्रशासन आणि कारखानदारांनी संगनमत तोडून तातडीने निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी ग्रामपंचायतीच्या ठरावातून करण्यात आली आहे.
Back to top button