बीड
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा सखोल अभ्यास व्हावा-प्राचार्य डॉ. विश्वास कदम

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा सखोल अभ्यास व्हावा-प्राचार्य डॉ. विश्वास कदम
गढी महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न
प्रतिनिधी गढी – जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य .डॉ.विश्वास कदम, प्राचार्य प्रोफे.डॉ.सदाशिव सरकटे,प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. कलंदर पठाण व प्रा. डॉ. रमेश रिंगणे हे उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ.रमेश रिंगणे यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या विविध ग्रंथाच्या आधारे महात्मा फुलेंनी सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न, बहुजन समाज व स्त्री शिक्षण यासाठी केलेले कार्य, समाजातील विविध अनिष्ट रूढी,प्रथा,परंपरा दूर करण्यासाठी केलेले कार्य, शेतकऱ्यांच्या विविध समस्या व त्यावरील उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. व त्यांनी केलेले कार्य व मांडलेले विचार यांची आजही तितकीच उपयुक्तता आहे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावरही प्रकाश टाकला. यानंतर कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी प्रा. डॉ.कलंदर पठाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज परिवर्तनासाठी केलेले क्रांतिकारी कार्य खरोखरच अतुलनीय आहे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करून त्यांनी जलतज्ञ म्हणून केलेल्या कार्यावर सखोल असा प्रकाश टाकला. यामध्ये शेतीच्या विविध समस्यावर मात करण्यासाठी पाण्याचा विनियोग, विविध सामाजिक समस्या व सामाजिक समानतेसाठी पाण्याचे महत्व ओळखून त्यांनी केलेले कार्य व मांडलेले विचार यावर सखोल असे मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रोफे.डॉ.सदाशिव सरकटे यांनी यावेळी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्याचा वारसा पुढे जोपासण्याचे कार्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजातील विविध सामाजिक समस्या मांडणारे ग्रंथ लिहिले. आजही आपल्या समाजात त्या समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी त्यांच्या विचारांचा व कार्याचा अभ्यास प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतीयांना सन्मानाने जगण्याची अधिकार दिले आहेत. राष्ट्र विकासाला हातभार लावणारे असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखाण केले नाही. त्यांच्या या अतुलनीय बुद्धिमत्तेची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. जगाला समजलेले बाबासाहेब खऱ्या अर्थाने भारतीयांना समजले पाहिजेत ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने आपल्याला समजण्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याच्या एक एक पैलूवर सखोल असा अभ्यास होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. स्त्री समानता किंवा स्त्रीसन्मान याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करावी. कोणत्याही राष्ट्राच्या विकासामध्ये स्त्रियांची महत्त्वाची भूमिका असते.त्यामुळेच स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून ज्योती-सावित्री व हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचे द्वारे उघडली. ज्याची फलश्रुती म्हणून आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला मुक्तपणे संचार करून उल्लेखनीय असे कार्य करत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रोफे. डॉ.संतोषकुमार यशवंतकर, प्रस्ताविक विद्यार्थी विकास प्रमुख प्रा.हिरा पोटकुले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रोफे.डॉ. राणी जाधव यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



