बीड

बँगलोर अंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात पोहचला “डियर पँथर’

  बँगलोर अंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात पोहचला “डियर पँथर’
जागतिक पातळीवरील ३,२१३ नोंद लघुपटातून ३१ ची झाली निवड
प्रतिनिधी | बीड:-‘नांगेली’ सारख्या वास्तववादी नाटकाच्या यशानंतर धनंजय साबळे यांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कामगारांच्या समस्या आणि त्याचे निराकरण या विषयावर ‘डियर पँथर’ हा १५ मिनिटांचा लघुपट त्यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाची नुकत्याच भारतातील एकमेव ऑस्कर पुरस्कार अधिकृत ‘बँगलोर अंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात’ निवड झाली. महाराष्ट्रातून ‘डियर पँथर’ हा मराठी भाषिक लघुपट जागतिक ऑस्कर पुरस्कार श्रेणीमधील महोत्सवात दाखवला जाणार आहे. जागतिक स्तरातून ३,२१३ पर्यंत आलेल्या नोंदणी मधून २६६ चित्रपट,माहितीपट,लघुपट निवडल्या गेलेत आणि त्यातून केवळ ३१ हे लघुपट बंगलोरच्या या महोत्सवात निवडक ठरले आहेत.
     अर्हत प्रोडक्शन मुंबई या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माते धनंजय साबळे आणि नितीन शिंदे यांच्या ‘डियर पँथर’ ऑस्कर पुरस्कार अधिकृत बंगरुळू इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीव्हल सारख्या नामांकित चित्रपट महोत्सवात निवड होणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे. भारतातील हा एकमेव असा चित्रपट महोत्सव आहे जो ऑस्कर पुरस्कार अधिकृत आहे.  या महोत्सवा बरोबर जर्मनी इथल्या कोबानी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल जर्मनी चित्रपट महोत्सवात देखील उपांत्यपूर्व फेरी या श्रेणीत ‘डियर पँथर’ लघुपटाची निवड झाली आहे. या अगोदर हा लघुपट छत्रपती संभाजीनगर येथील दहाव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘स्पेशल स्कीनिंग’ या कॅटेगरी मध्ये दाखविला गेला.  त्याच बरोबर एप्रिल मध्ये चेन्नई येथील नामांकित पीके रोझी फिल्म महोत्सवात या लघुपटाची फार सराहना झाली होती. पीके रोझी या चित्रपट महोत्सवात लघुपटाची दक्षिणात्य दिग्दर्शक पा. रणजिथ यांनी चित्रपटाची फार प्रशंसा केली.
 मुंबईतील उच्च शिक्षीत कामगारांवर केंद्रीत फिल्म : ‘चित्रपटाचा नायक ‘पँथर’ एक पीएचडी धारक विद्यार्थी आपल्या हक्काच्या घरासाठी स्थानिक महानगरपालिकेशी हक्काची लढाई लढतोय. ‘पँथर’ हे नाव सरकारी अन्यायाविरुद्ध व्यापक लढ्याचे प्रतिक म्हणून लेखक दिग्दर्शक धनंजय साबळे यांनी वापरलेले आहे. महानगर पालिकेत आपल्या वडिलांच्या जागेवर चतुर्थश्रेणी पदावर काम करणारा पँथर हा युवक सरकारकडे आपल्या हक्काच्या घरासाठी वारंवार मागण्या करतो पण त्याच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. तर दुसरीकडे चाळीत राहणारी एक विद्यार्थिनी जिला सीए होण्याचं स्वप्न आहे पण राहायला छप्पर हवं त्यामुळं नाईलाजाने उच्चशिक्षणाचं स्वप्न बाजूला सारून चतुर्थश्रेणी या पदावर सफाई कर्मचारी म्हणून कामाला सुरुवात करते.  इतकी वर्षे काम करून सुद्धा एकाही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला आपलं हक्काचं घर कधीच मिळालेलं नाही, किंवा या तुटपुंज्या पगारावर तो स्वतःचं घर मुंबई सारख्या शहरात विकत घेऊ शकत नाही. सरकारकडून आरोग्य सेवेचा हवा तसा लाभ मिळत नाही. हा प्रवासावर यातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या परिस्थितीत न्याय मिळवण्यासाठी पँथर चा संघर्ष यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याला लोकनाथ यशवंत यांची ‘साखळी’ नावाची कवितेतून मांडलेल्या संघर्ष आणि वास्तव याची जोड देण्यात आली आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरचा धनंजय साबळे यांने धनंजय साबळे यांनी या लघुपटाचे लेखन तसेच दिग्दर्शन केले असून कलाकार म्हणुन धनंजय साबळे, शोनाली ढाकणे-साबळे, दिपाली बडेकर, नितीन शिंदे, अश्लेषा गाडे, अतिश आखाडे, अंकुश चौरपगार, अमर लहाने, वनिता कदम, विलास तांबे यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक धनंजय साबळे हे मुळ छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्यांनी मिलिंद विज्ञान महाविद्यालयातून उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढील पदवी, पदव्युत्तर शिक्षण मुंबईतील सेंंट झेवीयर्स इन्स्टीट्युट ऑफ कम्युनिकेशन मुंबई आणि मास्टर थिअटर आर्टस, मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे.
—-
डियर पँथर : चित्रपट संस्था – अर्हत निर्माता धनंजय साबळे, नितीन शिंदे, चित्रपटाचे नाव- डियर पँथर लेखक, दिग्दर्शक – धनंजय निर्मलक्ष्मण साबळे, छायाचित्रण- अजय सागर, पार्श्वसंगीत – प्रतिक बोरसे
व्हीएफएक्स निर्माता- स्वप्नील सरगडे, आर्ट- गौरव ओव्हळ, रोहित मोरे, हेमंत वाल्वी, एडिटर- शोनाली ढाकणे साबळे, आकाश मोरे पोस्टर आणि जनसंपर्क- जय कुंभारे, अथर्व बारापत्रे तसेच बाल कलाकार आराध्या अमित जाधव, शौर्या संदेश कदम व समस्त बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्र. १२८, कासारवाडी, दादर, मुंबई यांचे सहकार्य लाभले आहे.
—-
अशी सूचली संकल्पना

एकदा मोबाईल वर स्क्रोल करत असताना एक बातमी नजरेस पडली. चेंबूर-गोवंडी भगर ड्रेनेज मध्ये पडून दोन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू. अशा मथळ्याखाली ती बातमी होती आणि त्याचं वेळेस चंद्रयान लॉंच हिण्याची लगबग आणि उत्साह सुरु होता. मग डोक्यात विचार आला कि एकीकडे चंद्रयान चं प्रक्षेपण करून भारत प्रगती पथाकडे जातोय आणि दुसरीकडे जमिनीवरचे प्रश्न सोडवण्यात अजूनही दिरंगाई, दुर्लक्ष केलं जातंय.? आणि ह्या झालेल्या त्रासातूनच लघुपट करायचा विचार मनात घर करून राहिला. या संकल्पणेतून पँथर पुढे आल्याचे दिग्दर्शक धनंजय साबळे सांगतात.

Back to top button