बीड
न्यायालयाच्या ‘स्टे’ला खाकीचा तोरा! सिरसाळात लॉकडाऊनमधील महसुली बोगसगिरीला नव्या ठाणेप्रमुखांचे ‘अभय’; गरीबांच्या जमिनीवर राजकीय दलालांमार्फत थेट कब्जा

न्यायालयाच्या ‘स्टे’ला खाकीचा तोरा! सिरसाळात लॉकडाऊनमधील महसुली बोगसगिरीला नव्या ठाणेप्रमुखांचे ‘अभय’; गरीबांच्या जमिनीवर राजकीय दलालांमार्फत थेट कब्जा
माजलगाव कालव्याच्या संपादनात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा मोठा झोल; दीड किलोमीटर दूर असलेल्या बोगस दावेदारांना रस्त्यावरील मोक्याच्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा; परळी कोर्टाचे आदेश हवेत उडवून गुंडगिरी आणि धमक्यांचे सत्र सुरू
बीड, ता.14:- संपूर्ण जग जेव्हा करोनाच्या भीषण महामारीने आणि लॉकडाऊनच्या भीतीने घरात कुलूपबंद होते, तेव्हा परळी तालुक्यातील सिरसाळ सज्जाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी मात्र वेगळ्याच काळबाजारामध्ये व्यस्त होते, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. माजलगाव धरणातून नांदेडकडे जाणाऱ्या कालव्याच्या जमीन संपादनात या महसुली महाशयांनी असा काही चमत्कार केला आहे, ज्याने भूमाफियांचेही डोळे पांढरे व्हावेत, हा शासकीय कागदपत्रांमधील बोगसगिरीचा खेळ एवढ्यावरच थांबला नाही, तर आता यात सिरसाळा पोलीस ठाण्याच्या नव्या कारभाऱ्यांची तोंडी मेहेरबानी लाभल्याने न्यायालयाने दिलेला स्थगिती (स्टे) आदेशही पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावर पायदळी तुडवला जात असल्याचे विदारक चित्र सिरसाळ येथे पाहायला मिळत आहे.
माजलगाव धरणाचा कालवा अनेक वर्षांपूर्वी सिरसाळ येथील गोवर्धन सर्कलच्या गट नंबर १०४ आणि १०५ मधून गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात चिरीमिरीच्या जोरावर येथील तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शासकीय दप्तरात चक्क बनाव केला. प्रत्यक्ष कालवा गट नंबर १०४ आणि १०५ मध्ये असताना, कागदोपत्री तो चक्क गट नंबर १०३ मधून गेल्याचे दाखवण्यात आले. या एकाच महसुली बोगसगिरीमुळे मूळ आणि गरीब शेतकरी अशोक भीमा पवार आणि शहाजी रामभाऊ पवार यांची मालकी हक्काची जमीन शासकीय दप्तरात अचानक शासन जमा झाली. आपल्याच हक्काच्या जमिनीसाठी या गरीब शेतकऱ्यांना परळी न्यायालयात धाव घ्यावी लागली. हा महसुली घोटाळा इथेच संपत नाही. मूळ शेतकरी अशोक पवार आणि शहाजी पवार हे न्यायालयात आपल्या जमिनीच्या हक्कासाठी लढा देत असतानाच, या भ्रष्ट साखळीने आणखी एक काळा कारनामा केला. रस्त्याच्या कडेला असलेली आणि कोट्यवधी रुपयांची किंमत असणारी अशोक पवार व शहाजी पवार यांची गट नंबर १०३ मधील मूळ जमीन लाटण्यासाठी अनिल जयसिंग पवार आणि सुनील जयसिंग पवार या दोघांना हाताशी धरण्यात आले. या दोघांची मूळ जमीन प्रत्यक्ष घटनास्थळापासून तब्बल दीड किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी खिसे गरम करून घेत चक्क चतुरसिम (नकाशाच्या सीमा) चुकीच्या दाखवल्या. दीड किलोमीटर दूर असलेल्या अनिल आणि सुनील पवार यांना थेट रस्त्याच्या कडेला आणून बसवले आणि अशोक व शहाजी पवार यांच्या जमिनीवर बोगस ताबा मिळवून दिला. आपल्या जमिनीवर झालेला हा बेकायदेशीर आणि बोगस ताबा पाहून पीडित शेतकरी अशोक पवार आणि शहाजी पवार यांनी परळी कोर्टात धाव घेतली. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या जागेवर तातडीने स्थगिती आदेश जारी केला. कोर्टाचा ‘स्टे’ असतानाही अनिल आणि सुनील यांनी त्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरू केले होते. त्यावेळी सिरसाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दहिफळे यांनी कायद्याचा आदर राखत बोगस ताबा टाकणाऱ्यांना कडक समज दिली आणि कोर्टाचा निर्णय येईपर्यंत काम पूर्णपणे बंद पाडले होते. काही दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याचे कारभारी बदलले आणि पोलीस निरीक्षक बाबा राठोड हे रुजू झाले. नवे साहेब येताच राजकीय दलाल आणि भूमाफिया कमालीचे सक्रिय झाले. त्यांनी बाबा राठोड यांच्याभोवती फिल्डिंग लावून त्यांना दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती दिली. न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट स्थगिती आदेशाची प्रत फाईलमध्ये पडून असतानाही, ठाणेप्रमुख बाबा राठोड यांनी चक्क त्या बोगस जागेवर बांधकाम करण्यासाठी दावेदारांना तोंडी परवाना दिल्याचा खळबळजनक आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून अनिल आणि सुनील पवार यांच्याकडून मूळ जमीन मालक अशोक पवार आणि शहाजी पवार यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कोर्टात केस सुरू असल्याने आणि पोलीस ठाण्यातून दावेदारांना तोंडी पाठबळ मिळाल्याने या गुंडगिरीला ऊत आला आहे. याच अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी जेव्हा अशोक पवार आणि शहाजी पवार हे सिरसाळा पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा त्यांच्यासोबत अत्यंत संतापजनक वर्तन झाले. ठाणेप्रमुख बाबा राठोड यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखण्याऐवजी मूळ शेतकऱ्यांनाच अर्वाच्य आणि अत्यंत हीन भाषेत बोलून पोलीस ठाण्यातून हाकलून दिले.
चौकट
न्यायालयापेक्षा खाकीचा रुबाब मोठा की दलालांची माया?
या संपूर्ण प्रकरणावरून आता बीड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. न्यायालयापेक्षा पोलीस ठाण्याचा प्रमुख मोठा झाला आहे का? असा थेट सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. महसूल विभागातील दोन-तीन कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीची सजा आज दोन गरीब शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भोगावी लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात महसूल विभागाने केलेल्या या पापाला आता पोलिसांचे खाकी कवच मिळाल्यामुळे सिरसाळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत.
चौकट
तातडीच्या चौकशीची मागणी
सिरसाळ येथील हा जमीन घोटाळा केवळ एका जमिनीपुरता मर्यादित नसून, यात मोठी संघटित साखळी कार्यरत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालणे गरजेचे आहे. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची आणि शासकीय दप्तरात हेराफेरी करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून, गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.
चौकट
तलाठी मंडळ अधिकाऱ्यांची किमया; अनिल अन् सुनीलला एक एकर जमीनच ‘गिफ्ट’
दीड किलोमीटर अंतरावर असलेली अनिल जयसिंग पवार आणि सुनील जयसिंग पवार यांची ‘ती’ एक एकर जमीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी मूळ जाग्यावरच कागदोपत्री कायम ठेवली. मात्र, प्रत्यक्षात मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली अशोक पवार आणि शहाजी पवार यांची मौल्यवान जमीन दाखवून बेकायदेशीर ताबा मिळवून दिला. शासकीय नकाशा आणि चतुरसिम (सीमा) चक्क चुकीच्या दाखवून रस्त्यावरील मोक्याची जागा अनिल आणि सुनीलला जणू गिफ्ट दिली की काय, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. दीड किमी दूर असलेली जमीन अचानक मुख्य रस्त्याला लागून कशी काय येऊ शकते, हा चमत्कार केवळ चिरीमिरीच्या जोरावरच घडल्याचा संशय बळावला आहे. या बोगसगिरीमुळे गरीब शेतकरी भूमिहीन झाले असताना, महसूल अधिकाऱ्यांच्या या गिफ्ट पॅकेजची आता वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन गुन्हे दाखल होणार का, याकडे संपूर्ण परळी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
——



