बीड

बातमीचा ऐतिहासिक प्रभाव! ४८ तासांत श्रीवर्धनमध्ये आधार सेवेचे पुनरागमन;

बातमीचा ऐतिहासिक प्रभाव! ४८ तासांत श्रीवर्धनमध्ये आधार सेवेचे पुनरागमन;

तहसीलदारांच्या धडाकेबाज निर्णयाने ११ महिन्यांची प्रतीक्षा संपली

तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात नव्या जोमाने कामकाज सुरू; हजारो नागरिकांना दिलासा, प्रशासनाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक
श्रीवर्धनचा “आधार” अखेर परतला
श्रीवर्धन (संदेश घोलप):श्रीवर्धन शहरातील आधार सेवा तब्बल ११ महिन्यांपासून बंद असल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने प्रशासनाला अक्षरशः जाग आणली. अवघ्या ४८ तासांत तहसीलदारांनी स्वतः पुढाकार घेत तांत्रिक समन्वय आणि आवश्यक यंत्रणा उभारणी करत तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात आधार नोंदणी व अद्ययावत सेवा पुन्हा सुरू केली. या धडाकेबाज निर्णयामुळे हजारो नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
वृत्त प्रकाशित होताच तहसीलदारांनी संबंधित विभागप्रमुख, सेतू केंद्र समन्वयक, तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. बंद पडलेली बायोमेट्रिक यंत्रणा त्वरित दुरुस्त करण्यात आली. आवश्यक नवीन उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सेवा सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.
गेल्या जवळपास वर्षभर नागरिकांना आधार नोंदणी, पत्ता बदल, मोबाईल क्रमांक लिंक, बायोमेट्रिक अपडेटसाठी ४० ते ६० किमी दूर बोर्ली पंचतन, म्हसळा,महाड,माणगाव आदी ठिकाणी जावे लागत होते. प्रवासखर्च, वेळेचा अपव्यय आणि शारीरिक त्रास सहन करत नागरिकांनी मोठी कसरत केली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला व विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला होता.
आधार सेवा सुरू झाल्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज, वृद्धापकाळ पेन्शन प्रस्ताव, पीएम किसान योजना, बँक खाते लिंकिंग, जात व उत्पन्न प्रमाणपत्र यांसारखी अनेक रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत.
“आम्ही ११ महिने त्रास सहन केला. पण बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला, याबद्दल समाधान आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.
सेवा सुरू झाल्यानंतर वाढती गर्दी लक्षात घेता अतिरिक्त काउंटर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आधार सेवा नियमित व अखंडित सुरु ठेवण्यात यावे  तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास पर्यायी यंत्रणा तत्काळ उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे,
श्रीवर्धनचा हरवलेला ‘आधार’ अखेर परतला असून, या घटनेने स्थानिक प्रशासनाच्या तत्परतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. ११ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
Back to top button