बीड
विवेकाची पेरणी करणाऱ्या प्राचार्या सविता शेटे आणि एकल महिलांचा आधारवड रुक्मिणी नागापुरे; सावित्रीच्या खऱ्या लेकी!- राजकुमार कदम, बीड.

विवेकाची पेरणी करणाऱ्या प्राचार्या सविता शेटे आणि एकल महिलांचा आधारवड रुक्मिणी नागापुरे; सावित्रीच्या खऱ्या लेकी!- राजकुमार कदम, बीड.
क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठान, पाटोदा समाज परिवर्तनासाठी झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांना प्रोत्साहित करण्याचे कार्य सातत्याने करत असते. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॉम्रेड एक्बाल पेंटर यांनी यांनी ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली आहे. क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांचा सहवास लाभलेल्या या ऐंशी पार केलेल्या तरूणाची तडफ वाखाणण्याजोगी आहे. जानेवारी महिन्यात राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. त्यानिमित्त पुरोगामी परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्ते आणि सावित्रीच्या लेकींचा सन्मान केला जातो. यावर्षी क्रांतिसिंह प्रतिष्ठान शनिवार दिनांक 01 फेब्रुवारी रोजी विवेकाची पेरणी करणाऱ्या प्राचार्य सविता शेटे यांना ‘नरेंद्र दाभोळकर प्रेरणा पुरस्कार’ आणि एकल महिलांचा आधारवड रुक्मिणी नागापुरे यांचा ‘सावित्रीबाई फुले समाज ज्योती’ पुरस्कार देऊन सन्मान करत आहे. त्या निमित्त सावित्रीच्या या खऱ्याखुऱ्या लेकींच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
– प्राचार्या डॉ. सविता शेटे:
प्राचार्य सविता शेटे हे नाव महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रास चांगलेच सुपरिचित आहे. बीड येथील माऊली विद्यापीठ,केज संचलित महिला महाविद्यालयाच्या त्या दीर्घकाळ प्राचार्य होत्या. 1983 साली मुरूड येथे निदेशक पदा पासून त्यांनी शिक्षकी पेशास सुरवात केली. 1986 ते 1990 पर्यंत शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होम सायन्स विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्य केल्या नंतर 1990 साली त्या बीड येथील महिला महाविद्यालयात प्राध्यापक तथा प्रभारी प्राचार्य म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर 1998 पासून ते 2023 पर्यंत त्या या महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या. मधे एक वर्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या डेप्युटी रजिस्टार म्हणुन त्यांनी कार्य केले.
प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम करताना आपले नेमून दिलेले काम तर त्यांनी केलेच . विद्यार्थी-प्रिय अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्या सुपरिचित होत्या. त्याचबरोबर देशाचे जबाबदार नागरिक घडविण्याकडे त्यांनी लक्ष दिले. विद्यार्थीनीं मधे ‘विवेकवाद’ रुजविण्याचे त्यांनी कटाक्षाने प्रयत्न केले. सेवाकाळात सिनेट, नॅकसह विद्यापीठांशी संलग्न विविध समित्यांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. राज्य व देश पातळीवरील विविध कॉन्फरन्स मधे भाग घेत त्यांनी अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण पेपर सादर केले. दशेत राष्ट्र सेवा दलाशी त्यांचा संबंध आला होता, तो त्यांनी आजतागायत कायम ठेवला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. बीड जिल्हाध्यक्ष पदा पासून ते अनिसच्या केंद्रीय कमिटी पर्यंत त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद नरेंद्र दाभोळकर यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. विवेक वाहिनीच्या माध्यमातून त्यांनी शाळा महाविद्यालयांत अनेक उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न या माध्यमातून करण्यात आले. होळीच्या वेळेस ‘कचऱ्याची होळी करा आणि होळीची पोळी दान करा!’ सारखे उपक्रम असतील किंवा प्रदूषणाचे तोटे पटवूनदेताना ‘फटाके मुक्त दिवाळी’ उपक्रम असेल. नागपंचमीवेळी सर्पविज्ञाना बद्दल शास्त्रशुद्ध माहिती! शाळा शाळां, महाविद्यालयांत जावून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरूच असतो. त्याचवेळेस ‘जादूटोणा’ करून लोकांची फसवणूक करणाऱ्या ‘भोंदू बाबां’चा पर्दाफाश करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
त्यांच्या या ‘शैक्षणिक’ व ‘सामाजिक’ कार्याची दखल अनेक संस्थांनी घेत त्यांचा गौरव केला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, कर्तृत्ववान महिला सन्मान, आधारस्तंभ आदि वीस सामाजिक शैक्षणिक संस्थांनी प्राचार्य डॉ. सविता शेटे यांना सन्मानित केले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठान ही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करत आहे.
रुक्मिणी नागापुरे:-
——————————
क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानने यावर्षी दखल घेतलेली दुसरी रणरागिनी आहे रुक्मिणी नागापुरे. एकल महिलांना संघटीत करून त्यांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचे शिकवणारी ही सावित्रीची खरीखुरी लेक! जोडीदार इहलोकीची यात्रा मधेच सोडून गेल्या नंतर बहुतांश एकल महिला खचून जातात.त्यांना हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते. विधवाच केवळ एकल महिला नाहीत तर परितक्त्या, घटस्फोटित, पतीने सोडलेल्या, पतीला सोडलेल्या, प्रौढ कुमारिका अशा विविध प्रकारच्या हजारो महिला या प्रकारात येतात. आणि या महिलांचे प्रश्न समान आहेत.
वयाच्या सव्वीस सत्तावीसाव्या वर्षीच जोडीदार अकाली सोडून गेल्याने रुक्मिणी नागापुरे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मागे दोन कच्छी बच्छी! रडत न बसता त्या परिस्थितीला भिडल्या. मुलांना शिकवत शिकवत त्यांनीही आपले शिक्षण पुढे सुरू केले. आयटीआय मधे इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन डिझायनिंगचे कोर्स केले. त्याच बरोबर उच्च शिक्षण घेत बी. ए. एम. ए. पर्यंतच्या पदव्याही त्यांनी मिळवल्या. एकल महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर ऊभा करण्याचा विडाच त्यांनी उचलला. मराठवाड्यातील सुमारे तीन हजार महिलांना त्यांनी प्रशिक्षित केले.
एकल महिलांना सासर माहेरची म्हणावी अशी साथ मिळत नाहीच. उपेक्षा, उपहासाचे जीने तीला जगावे लागते. स्वतः सक्षम झाल्या अशा समदु:खी महिलांना उपेक्षेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय त्यांनी घेतल. एकल महिला संघटनेची त्यांनी स्थापना केली. अशा महिलांना संघटीत करण्यासाठी पायाला भिंगरी लावून त्यांनी फिरायला सुरवात केली.तालुक्या पासून सुरू केलेल्या कार्याचा परीघ त्यांनी वाढविण्यास सुरवात केली. मराठवाड्यातील चार जिल्ह्य़ातील अकरा तालुक्यात त्यांनी आपले संघटन वाढवले आहे. चारशे बेचाळीस गावातील सुमारे वीस हजार महिलांना त्यांनी संघटनेशी जोडले आहेत. या संघटने मार्फत लोकशाही मार्गाने आंदोलने करून महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. एकल महिलेचे अनेक प्रश्न असतात. त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन तर विकृत असतोच परंतु अनेकदा कागदोपत्री विवाहाची नोंद नसते. आधार कार्ड, पॅन कार्ड नसते, रेशनकार्ड वर नाव नसते. पती निधनानंतर संपतीपासून तील बेदखल केले जाते. एकल महिलांच्या अशा समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी एकल महिला सक्षमीकरणाचा लढा सुरू केला.
स्वावलंबी महिला निधी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्या काम करताहेत. या संघने मार्फत महापुरुषांच्या जयंत्या, संविधान दिन, मनुस्मृती दहन असे कार्यक्रम राबवले जातात. समाजातील अनिष्ट रूढींना छेद देत वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला जातो. संविधानिक मुल्ये, शिक्षणाचे महत्त्व पटवून देत महात्मा जोतिराव फुले यांच्या सावित्रीबाईचा वारसाच रुक्मिणीबाई चालवत आहेत.
सावित्रीच्या या दोन्ही लेकींचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. सावित्रीच्या लेकींनी भिडेवाड्याकडे तोंड करावे यासाठी या दोघींही प्रयत्नशील आहेत. स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि अंधश्रद्धा व पाखंडवादावर प्रहार हे या दोघींच्याही कामाचे समान सुत्र आहे. त्यांचा गौरव हा सावित्रीच्या खऱ्याखुऱ्या लेकिंचा गौरव आहे…



