जामखेड आगाराचा ढिसाळ कारभार ; विद्यार्थिनींची गैरसोय!

जामखेड आगाराचा ढिसाळ कारभार ; विद्यार्थिनींची गैरसोय!
मोफत पास मिळूनही प्रवासाचा प्रश्न कायम?
जामखेड : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास योजना सुरू केली असली, तरी जामखेड आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे या योजनेचा लाभ विद्यार्थिनींना प्रभावीपणे मिळत नसल्याचे चित्र आहे.
बस वेळेवर न येणे, कधी दोन-तीन तास उशीर होणे, तर कधी बसच न येणे, अशा प्रकारांमुळे विद्यार्थिनींना चार-पाच किलोमीटर अंतर उन्हात पायपीट करत शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून शैक्षणिक नुकसानही होत आहे. परीक्षेच्या काळात तर पेपरला उशीर होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
आज बुधवारी दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी तालुक्यातील पिंपळवाडी येथील मुली सकाळी साडेसहापासून बसची वाट पाहत होत्या; मात्र बस न आल्याने त्यांना पायपीट करावी लागली आणि पेपरला उशीर झाला. याबाबत डेपो मॅनेजर प्रमोद जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बस सोडल्याचे सांगितले; मात्र प्रत्यक्षात बस आलीच नाही.
दरम्यान, वाहतूक नियंत्रण कक्षातील फोन बंद असणे, अधिकाऱ्यांकडून अचूक माहिती न मिळणे, यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची गैरसोय वाढत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने तातडीने नियोजन सुधारून विद्यार्थिनींची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.



