बीड
पोलिसांचा ॲक्शन मोड ; हजारोंचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त

पोलिसांचा ॲक्शन मोड ; हजारोंचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त
पाच हॉटेलांवर एकाचवेळी छापे,धंदेगारावर गुन्हे दाखल
जामखेड प्रतिनिधी :
जामखेड शहरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडत विविध हॉटेलांवर धडक कारवाई केली. खर्डा पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईत देशी व विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला असून पाच जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जामखेड शहरातील काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने मद्यविक्री सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी खर्डा रोड आणि नगर रोड परिसरातील काही हॉटेलांवर एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईदरम्यान विविध ब्रँडच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याची किंमत सुमारे ४१ हजार ४७० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणात सागर पांडुरंग नेटके, ज्ञानेश्वर रंजित तांबे, राजेंद्र रामभाऊ देवकाते, सचिन विक्रम तनपुरे आणि उमेश विनोद मुळे यांच्याविरोधात दारूबंदी कायद्यानुसार जामखेड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर मोहीम अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्गे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. कारवाईत पोलीस कर्मचारी शशी म्हस्के, पंडित हंबर्डे, धनराज बिराजदार, अशोक बडे आणि गणेश बडे यांनी सहभाग घेतला.पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
अवैध व्यवसायांवर पोलिसांची नजर
—————————— ————–
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत जामखेडमधील ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात आणखी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



