बीड

श्रीवर्धन मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा २० मे रोजी ‘सार्वजनिक वाचनालय’ येथे होणार गुणगौरव

श्रीवर्धन मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा २० मे रोजी ‘सार्वजनिक वाचनालय’ येथे होणार गुणगौरव
श्रीवर्धन, दि. १८ (संदेश घोलप): मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेत श्रीवर्धन तालुक्यातून घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी श्रीवर्धन नगरी सज्ज झाली आहे. स्थानिक पातळीवर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या येथील ‘सार्वजनिक वाचनालय, श्रीवर्धन’ या संस्थेच्या वतीने येत्या बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी एका विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा भव्य सत्कार सोहळा बुधवार, २० मे रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या मुख्य सभागृहात संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांमध्ये श्रीवर्धन तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कौशल्याची मोहोर उमटवली, अशा सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना या सोहळ्यात सन्मानित केले जाणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि जिद्दीच्या जोरावर तालुक्यात अव्वल स्थान पटकावणाऱ्या या गुणवंतांचे कौतुक करून, त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या भागातील या चमकत्या ताऱ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील शिक्षणप्रेमी, नागरिक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन सार्वजनिक वाचनालय, श्रीवर्धनच्या कार्यकारी मंडळाकडून करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
Back to top button