बीड
विजेच्या तारावरील धोकादायक फांद्या व खांबावरील वेल पावसाळ्यापूर्वी तोडावेत

विजेच्या तारावरील धोकादायक फांद्या व खांबावरील वेल पावसाळ्यापूर्वी तोडावेत
आष्टी तालुक्यातील जनतेची मागणी
आष्टी (. प्रतिनिधी )
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये गावोगावी वाडी आणि वस्तीवर वीज पोहोचली आहे. खेडोपाडी विजेचे खांब आणि ताराचे जाळे पसरले आहे. या खांबांना म्हैस वेल,गुळवेल, कावळी यासारख्या वेलांनी विळखा घातलेला आहे. तसेच विजेच्या लाईन जवळ असलेली जुनी झाडे व उगवलेल्या नवीन झाडांच्या फांद्या सुद्धा विजेच्या तारांना चिकटलेल्या आहेत. झाडे आणि वेल विद्युत वाहक असल्यामुळे हे अत्यंत धोकादायक आहे.
या तारांजवळ शेतकऱ्यांच्या शेतातील आंबा, चिंच, नारळ आदी फळझाडे सुद्धा आहेत.या झाडाच्या फांद्या विजेच्या तारांना चिकटलेल्या असल्यामुळे या झाडावरील फळे तोडणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. खांब लोखंडी असो किंवा सिमेंटचा असो या खांबाला वेगवेगळ्या प्रकारच्या वेलींनी विळखा घातलेला आहे. अशा खांबावरून वेली तारेवरती गेलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये वेली मार्फत विद्युत प्रवाह खांबाजवळील जमिनीमध्ये येतो. हा प्रकार प्रचंड धोकादायक आहे. अशा खांबाजवळ जाणारा व्यक्ती असो किंवा एखादे जनावर असो त्याच्या जीवाला मोठा धोका आहे. अशा धोकादायक फांद्या व धोकादायक वेली पावसाळ्यापूर्वी काढून टाकण्यात येणे गरजेचे आहे.
अशा धोकादायक फांदीमुळे तालुक्यातील बेलगाव परिसरामध्ये सुमारे चार महिन्यापूर्वी एक मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडाच्या फांद्या व धोकादायक वेली काढून टाकाव्यात अशी मागणी तालुक्यातील जनतेतर्फे होत आहे.


