बीड
शेतकरी हक्क मोर्चाच्या ‘हलगी बजाव’ आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा!

शेतकरी हक्क मोर्चाच्या ‘हलगी बजाव’ आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा!
लिंबागणेशकरांचे हलगी वाजवत शेतकऱ्यांना आवाहन; पिकांचे पंचनामे करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई व २०२० चा थकीत पीकविमा तात्काळ जमा करण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे
बीड : (दि.१२) दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा अक्षरशः धुराळा झाला आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी शनिवारी दि. १२ सप्टेंबर रोजी लिंबागणेश येथे हलगी वाजवत केले.
चौकट १ : प्रमुख मागण्या
– नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
– मागील अतिवृष्टीच्या घोषणेनुसार हेक्टरी १७ हजार रुपये पीकविमा द्यावा.
– २०२० सालचा थकीत पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा.
– बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून दुष्काळ जाहीर करावा.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील गावागावांत शेतकरी बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांची माहिती देतानाच आगामी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.
चौकट २ : वाकनाथपूर बैठकीत आंदोलनाचा निर्धार
वाकनाथपूर येथे झालेल्या शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी बैठकीत पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, मागील अतिवृष्टीतील घोषणेनुसार हेक्टरी १७ हजार रुपये पीकविमा द्यावा, २०२० सालचा थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
या मागण्यांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
चौकट ३ : ‘हलगी बजाव’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी हक्क मोर्चाचे डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.
यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे डॉ. गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी, रविंद्र निर्मळ, बाळुकाका थोरात, सर्पमित्र अशोक जाधव, महादेव कुदळे, अर्जुन घोलप, गणपत तागड, संतोष भोसले, दादा गायकवाड, बाळासाहेब मुळे, शंकर वाणी, रामदास मुळे, रामकिसन गिरे, रामदास वाणी, शहाजी वाणी, संजय पावले, गणेश थोरात, कृष्णा वाणी यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. ८१८०९२७५७२



