संपादकीय

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी संपण्याची चिन्ह सध्या दिसत नाहीयेत. अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या बेंचपुढे ईडीच्या या याचिकेची सुनावणी पार पडली. अनिल देशमुखांना मोठा झटका देत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी बदलत त्यांना १२ नोव्हेंबर पर्यंत पुन्हा ईडी कोठडी सुनावली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनिल देशमुखांना ईडी ताब्यात घेणार आहे. अनिल देशमुखांना आता जेल कोठडीतून ईडी कोठडीत आणण्यात येणार आहे. अनिल देशमुखांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ६ नोव्हेंबर ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या ईडी कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर देशमुखांसाठी ईडी कोठडीची मागणी करत ईडीने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

त्यानंतर उच्च न्यायालयाने देशमुखांना झटका देत त्यांना पुन्हा ईडी कोठडी सुनावली. अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

Back to top button