संपादकीय

‘माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं’

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी कर्मचारी वर्गाकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हे आंदोलन स्थगित करण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे. सध्या हे प्रकरण अधिक चिघळताना दिसून येत आहे. तसेचएसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत असून सरकारने संप मागे घ्या, असे आवाहन करुनही कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.

यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ST संपाबाबत विरोधी पक्षाला नाट्य पुरस्कार देऊ, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला. तर, कामगारांनी आहे या पगारात समाधान मानावं, असेही राऊत यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरुन संपातील कर्मचाऱ्यांनी संजय राऊतांना चांगलंच सुनावलंय.

संजय राऊत यांची औरंगाबादमध्ये प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखा आहे. पगार मिळतो आहे त्यावर समाधानी राहावं’, असा सल्ला राऊत यांनी दिला. राऊत यांच्या या विधानावरुन संपातील कामगारांनी संताप व्यक्त केला आहे.

‘सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डूवाडी येथील बस आगारातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही म्हणता हाय या पगारात करा, आम्ही तुम्हाला मागितलंच काय आहे. मी माझा २५ हजार रुपये पगार संजय राऊत यांना देतो, त्यांनी स्वत:चं घर चालवून दाखवावं, माझं दुसरं काहीही मागणं नाही, असे एका कर्मचाऱ्याने संतप्तपणे म्हटले.
राऊत यांनी भावना दुखावणारी वक्तव्ये करू नयेत, असे बोलून आणखी आत्महत्या वाढवू नका. कामगार इकडं आत्महत्या करतोय, राज्यकर्त्यांनी जनाची नाही तर मनाची बाळगावी, असे म्हणत या कामगाराने आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

Back to top button