संपादकीय

एसटी आणि जिल्हा परिषद शाळा वाचवा, सदाभाऊंची भावनिक हाक

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या २ आठवड्यापासून आंदोलन करत असून या आंदोलनात आता भाजपा नेते सुद्धा उतरले आहे. त्यातच आता माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटेनचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ट्विट करून राज्य सरकारकडे विनंती केली आहे. या दोनच गोष्टींना वाचवा कारण या दोनच गोष्टी गरिबांच्या राहिल्या आहेत. कोणतीही श्रीमंत व्यक्ती एसटीने प्रवास करत नाही आणि कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत नाहीत, असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची नेहरू सेंटरमध्ये ४ तास बैठक झाली. मात्र, ठोस निर्णय होऊ शकला नाही. संपावर कसा तोडगा काढता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विलीनीकरणाचा मुद्दा हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. तिथे राज्य सरकारने काय बाजू मांडावी याबाबतही पवारांसोबत चर्चा झाली. विलीनीकरणाबाबत समितीचा जो अहवाल येईल तो आम्ही स्वीकारू, असे परब यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.

एसटी पुन्हा सुरू झाली पाहिजे. चर्चेच्या माध्यमातून एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यातून नकीच मार्ग काढतील. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत या आंदोलनात तेल टाकण्याचं काम करत आहेत, असा आरोप राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. यापूर्वी भाजपचं सरकार होतं तेव्हा सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या का मान्य केल्या नाहीत, असाही प्रश्न सत्तार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे.

Back to top button