संपादकीय

सावरकरांच्या नखाचीही सर तुम्हाला नाही! फडणवीसांनी साधला सेनेवर निशाणा

 

पुणे | भाजपच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी आमच्या माध्यम प्रतिनिधींनी मला प्रश्न विचारला हे भाजपचे शक्तिप्रदर्शन आहे का? कार्यालयाचे उदघाटन असल्याने कार्यकर्ते उत्साहाने इथे आले आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपने शक्तिप्रदर्शन करायचे ठरविले तर पुण्यातील एकही मैदान आम्हाला पुरणार नाही. आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. माझी नजर जिथपर्यंत जाते आहे तिथपर्यंत कार्यकर्तेच कार्यकर्ते दिसतायेत. आज तुम्ही सगळ्या लोकांनी या गोष्टीची खात्री दिली आहे की या महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळाच लागल्याशिवाय राहणार नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, मला अलीकडच्या काळात स्पेसिफिक भाजपचा भगवा सांगावा लागतो. याच कारण भगव्याची शपथ घेणारे आता अशा लोकांसोबत आहेत की ज्यांना भगव्याचा मानही नाही सन्मानही नाही आणि ज्यांना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेण्यात लाज वाटते. ते अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेत जे रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात.

पुढे बोटाना ते म्हणाले की, यावेळी एका गोष्टीच आश्चर्य आणि दुःख वाटतं काल परवा देशाच्या लोकसभेत दंगा करणाऱ्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आलं. या १२ खासदारांमध्ये शिवसेनेच्या २ खासदारांनाही निलंबित करण्यात आलं ज्यावेळी त्यांना सांगण्यात आलं तुम्ही संसदेची माफी मागा. तेव्हा हे म्हणतात माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? अरे निर्लज्जानो ! तुम्हाला लाज वाटली पाहिजे ११ वर्ष अंदमानच्या कारागृहात कोलूचा बैल बनून तेल गाळण ज्यांनी मान्य केले आणि त्याठिकाणी चाबकाचे फटके खाता खाता ‘भारत माता की जय’ जे सावरकर म्हणत होते त्या सावरकरांच्या नखाचीही सर तुम्हाला येऊ शकत नाही? याठिकाणी भ्रष्टाचाराच्या पैशातून ज्यांचे महाल पोसले गेले त्या पैशातून उभारलेल्या महालाच्या एसी ऑफिसमध्ये बसून जे सावरकरांचा अपमान करतात त्यांना या महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही हे देखील सांगायची आवश्यकता आहे.

आम्हाला लाज नाही आम्ही हिंदू आहोत हे आम्ही ठणकावून सांगणार, होय आम्ही सावरकरवादी आहोत आम्ही ठणकावून सांगणार होय आमचे बाप छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे आम्ही ठणकावून सांगणार होय आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणेच काम करू हे आम्ही ठणकावून सांगणार, हे सांगताना आम्हाला गर्व वाटतो आम्ही ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतो त्याचे नेतृत्व मोदीजी आहेत. ज्यांनी या भारताला एक नवीन दिशा दिली, असेही फडणवीस म्हणाले.

Back to top button