बीड

बीड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात ब्राईट सोशल फाउंडेशनचे निवेदन

बीड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात ब्राईट सोशल फाउंडेशनचे निवेदन

बीड | प्रतिनिधी
बीड शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर ब्राईट सोशल फाउंडेशन, बीड यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला इमेल द्वारे निवेदन पाठविण्यात आले. शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ब्राईट सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरातील मुख्य रस्ते, चौक, शाळा परिसर, बाजारपेठ, गल्ली-बोळ तसेच रहिवासी भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचे टोळके मोठ्या प्रमाणात फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर, सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर तसेच रात्री कामावरून घरी परतणाऱ्या लोकांवर मोकाट कुत्रे धावून जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक दुचाकीस्वारांचा कुत्र्यांमुळे तोल जाऊन अपघात झाल्याचे प्रकार समोर आले असून काही नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, शहरातील कचरा डेपो, उघड्यावर पडणारा अन्नकचरा तसेच नियंत्रणाच्या अभावामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. भविष्यात रेबीजसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये मोकाट कुत्र्यांची पकड मोहीम राबविणे, निर्बिजीकरण व लसीकरण करणे, शाळा व गर्दीच्या भागात विशेष पथके नेमणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा करणे तसेच नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
शहरातील नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही ब्राईट सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.
Back to top button